४०० दिवसांच्या कठीण तप साधनेतून श्रध्देसह एकजुटीचा संदेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
सकल जैन समाजातर्फे शहरातील दादावाडी जैन मंदिरात रविवारी, २१ सप्टेंबर रोजी ‘श्री सामूहिक वर्षीतप महोत्सव’ उत्साहात पार पडला. महोत्सवात ७५ ते ८० जैन बांधव कठोर वर्षीतप साधनेत मग्न आहे. जैन समाजाच्या धार्मिक परंपरांना अधोरेखित करणारा उपक्रम असल्याने परिसरात अध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले. यंदाच्या वर्षीतपाचे मुख्य लाभार्थी म्हणून महेंद्र कोठारी आणि मदनलालजी मुथा हे दोन कुटुंब पुढे आले होते. त्यांच्या सहकार्यामुळे महोत्सव यशस्वीरित्या पार पडत आहे.
जैन धर्मातील वर्षीतप हे अत्यंत कठीण मानले जाणारे व्रत आहे. साधक एका दिवसाआड भोजन करत सलग १३ महिने आणि १३ दिवस, म्हणजेच ४०० दिवस तप करतात. अशा तपामुळे साधकांना शारीरिक व आत्मिक शुद्धी लाभते, असे मानले जाते. आधुनिक काळात सामूहिक पद्धतीने तप दोन टप्प्यात २००-२०० दिवसांच्या स्वरूपात पार पाडले जाते. अशा अनोख्या साधनेत मोठ्या संख्येने उपासक सहभागी झाल्याने जैन समाजातील धार्मिक एकजूट आणि सामूहिक श्रद्धा अधोरेखित झाली. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून राजेश ललवाणी उपस्थित होते. त्यांनी तप करणाऱ्या साधकांचे अभिनंदन करत त्यांच्या कठोर साधनेचे कौतुक केले. आयोजक अशोक श्रीश्रीमाळ यांनी अशा उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा, धार्मिक जाणीव आणि सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारावले…!
महोत्सवात सहभागी झालेल्या साधकांचे विविध घटकांकडून सत्कार करण्यात आले. प्रोत्साहनपर संदेशांनी आणि समाजातील भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारावले. महोत्सवामुळे जळगावच्या जैन समाजात एक नवा उत्साह, श्रद्धा आणि परस्पर सहकार्याची भावना बळकट होत असल्याचे दिसून आले.