Jalgaon, MNS’s ‘Mobile Light Movement’ : जळगावात पथदिव्यांच्या अंधारात मनसेचे “मोबाईल लाईट आंदोलन”

0
10

पथसंंचलन करुन शासनाच्या निष्क्रियतेचा नोंदविला जाहीर निषेध

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

मोहाडी परिसरातील नव्याने उभारलेल्या शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने रुग्ण, विशेषतः गर्भवती माता आणि त्यांच्या नातेवाईकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अशा गंभीर दुर्लक्षाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे “मोबाईल लाईट आंदोलन” करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी मोबाईलचा प्रकाश प्रज्ज्वलित करून पथसंंचलन करुन शासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध नोंदवला.

पथदिवे नसल्याने रुग्णालयाच्या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. हे शासनाच्या विकासाच्या घोषणांना काळा फटका आहे, असा तीव्र रोष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेले हे शासकीय रुग्णालय १०० खाटांचे आहे. प्रसूती विभागही येथे कार्यरत आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकही पथदिवा कार्यरत नसल्याने रात्रीच्या वेळी रुग्ण आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या रस्त्यावर दिव्यांचा अभाव हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि नियोजनशून्यतेचा स्पष्ट दाखला असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या समस्येवर रुग्णालय प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. अंधारात प्रकाश दाखवणारे आंदोलन जनतेच्या डोळ्यांतील सत्य उजेडात आणणारे ठरले, अशा शब्दांत नागरिकांनी मनसेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

आंदोलनात यांचा होता सहभाग

आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, चेतन पवार, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड, ॲड. सागर शिंपी, हर्षल वाणी, ऐश्वर्य श्रीरामे, विकास पाथरे, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here