साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
प्रथम बस नगर ते पुणे चालविली गेली. त्यावेळी फक्त आठ आणे भाडे होते. आज बघता बघता दररोज विविध बसेसच्या माध्यमातून ५५ लाखापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. एसटी बसवर अनेक संकटे, आर्थिक समस्या, कधी आनंदी, कधी दुखी प्रवास करत ती जीवन वाहिनी बनली आहे. त्यामुळे अनेकांची ती आपलीशी झाली आहे. अंध, अपंग, वयोवृद्ध महिला, शालेय विद्यार्थिनी यांची हक्काची बस झाली आहे. स्पर्धेच्या युगातही चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांमुळे ‘लालपरीने’ विश्वासार्हता जपली असल्याचे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी केले. येथील बस स्थानकात शनिवारी, १ जून रोजी एसटी बसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी फीत कापून वर्धापन दिनाचे उद्घाटन केले.
यावेळी सर्वप्रथम बस स्थानक व्यवस्थापक पी.बी.भोई आणि त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. आगार प्रमुख यांनी बसेसला पुष्पहार चढविला. तसेचे एसटी बसचा वाढदिवस साजरा करतांना पी.बी.भोई, नाना पाटील, इतर कर्मचारी वर्गांचाही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. पर्यावरण जागर प्रतिष्ठान व शैक्षणिक आगाजतर्फे व्यवस्थापक पी.बी.भोई यांचा शाल, श्रीफळ देऊन नाना पाटील यांनी सत्कार केला. त्यानंतर प्रवाशांना पेढ्याचे वाटप करण्यात आले.
बस स्थानकाला सजविले
वर्धापन दिनानिमित्त बस स्थानकाचा परिसर सुसज्ज केला होता. विविध स्वरूपाची रांगोळी व भारतीय संस्कृतीनुसार बस स्थानकात सजावट केली होती. तत्पूर्वी बस आगारातून बस विविध स्वरूपात सजावट करून कर्मचाऱ्यांना एसटी स्थानकात आणण्यात आले. यावेळी प्रवासी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन आगार लेखाकार सुलेमान तडवी यांनी केले. यशस्वीतेसाठी सर्व प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा चालक, वाहक, सर्व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन धर्मराज देवकर तर आभार आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी मानले.