बॉल बॅडमिंटन स्पर्धेत होता तीन गटांचा समावेश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५- २६ च्या शालेय मनपा दोन दिवशीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात सर्वप्रथम शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेने सुरुवात झाली. ही स्पर्धा १८ आणि १९ ऑगस्ट दरम्यान स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केली होती. ही स्पर्धा १४, १७, १९ वर्षाच्या आतील अशा तीन विविध गटांमध्ये घेण्यात आल्या. स्पर्धेत शहरातील २७ संघांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर.बी.ठाकरे यांनी मैदानाचे पूजन व श्रीफळ फोडून केले. अध्यक्षस्थानी मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी सचिन निकम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे, समन्वयक प्रा.उमेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक डॉ.रणजीत पाटील तर आभार प्रा.महेंद्र राठोड यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल असा
स्पर्धेच्या लागलेल्या निकालात १९ वर्षाआतील मुलांमध्ये-विजयी सेंट लॉरेन्स हायस्कूल, उपविजयी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, मुलींमध्ये-विजयी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, उपविजयी सेंट लॉरेन्स हायस्कूल, १७ वर्षाआतील मुलांमध्ये-विजयी ए.टी.झांबरे विद्यालय, उपविजयी ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, मुलींमध्ये विजयी ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, उपविजयी बाल विश्व माध्यमिक विद्यालय, १४ वर्षाआतील मुलांमध्ये विजयी ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय, उपविजयी सेंट लॉरेन्स हायस्कूल, मुलांमध्ये विजयी ओरीयन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, उपविजयी सेंट लॉरेन्स स्कूल अशा विजयी संघांचा समावेश आहे.