नवीदिल्ली : वृत्तसंस्था
देशात चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून मध्यप्रदेशात भाजपाने तर तेलंगणामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली असून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.राजस्थानात भाजपाने बहुमत प्राप्त केले असून काँग्रेसच्या अशोक गहलोत सरकारला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.छत्तीसगडमध्ये भाजपा व काँग्रेसमध्ये मतमोजणी सुरु झाल्यापासून जोरदार रस्सीखेच सुरु असून रात्री भाजपाने निसटती आघाडी घेतली आहे. मध्यप्रदेशातील २३० जागांपैकी १५० हून अधिक जागांवर भाजपाने एकतर्फी आघाडी घेऊन दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर विजय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.या राज्यात भाजपाने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे तर राजस्थानातील अटीतटीच्या लढतीत भाजपाने (११३) बहुमताचा आकडा ओलांडला आहे.काँग्रेसला ७०जागांपर्यंत मजल मारता आली आहे तर इतर पक्षांनी १५ जागांवर विजय मिळवला आहे.मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएसने तेलंगणात सत्ता गमावली आहे.काँग्रेसने या राज्यात ६५ हून अधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.बीएसआरला ३६ जागांवर आघाडी मिळाली असून भाजपा ८ जागांंवर तर एमआयआय दोन जागांवर आघाडीवर आहे.
राजस्थानात भाजपा व काँग्रेसमध्ये जोरदार लढती रंगल्या. या राज्यात भाजपाला ४१.१३ टक्के मते मिळाली तर काँग्रेसला ३९.४५ टक्के मते मिळाली.दोन्ही पक्षातील मतांचे अंतर केवळ दिड टक्का असले तरी भाजपाच्या पारड्यात ११३ जागा पडल्या तर कांँग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावे लागले.मध्यप्रदेशात भाजपाला ४९ टक्के तर काँग्रेसला ४० टक्के मते मिळाल्याचे वृत्त आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील निवडणुकांचा कौल समोर आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार येथे भाजपा सत्तेच्या गादीवर बसणार असण्याची शक्यता आहे. मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचें वातावरण आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजपाच्या यशाबाबत पोस्टमधून त्यांनी राज्यांतील जनतेचे आणि भाजपा नेत्यांचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स पोस्टमध्ये म्हणाले, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणूक निकालांवरून भारतातील जनतेचा विश्वास केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणावर असल्याचे दिसून येत आहे. जनतेचा विश्वास भाजपावर आहे. या सर्व राज्यातील कुटुंबीयांचे, विशेषत: माता, बहिणी, मुली आणि आमच्या तरुण मतदारांनी भाजपवर प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो.
“मी त्यांना खात्री देतो की, आम्ही तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत राहू. त्यानिमित्त पक्षाच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी एक सुंदर उदाहरण मांडले आहे. तुम्ही भाजपची विकास आणि गरीब कल्याणकारी धोरणे ज्या पद्धतीने लोकांमध्ये नेली त्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच”, असेही मोदी म्हणाले.
“विकसित भारताचे ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाही आणि खचून जायचे नाही. आपल्याला भारताला विजयी करायचे आहे.आज आम्ही एकत्रितपणे या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले आहे”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आजच्या विजयाने २०२४ च्या हॅट्ट्रिकची गॅरंटी -मोदी
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपच्या विजयानंतर दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या निवडणुकीत देशाला जातींमध्ये विभागण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मी सतत म्हणत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार सर्वात मोठ्या जाती आहेत, त्या म्हणजे आपली स्त्रीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि गरीब कुटुंबे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, या चार जातींना सशक्त करूनच देश सशक्त होणार आहे. आजही माझ्या मनात तीच भावना आहे. मी माझ्या माता, बहिणी आणि मुलींसमोर, माझ्या तरुणांसोबत, माझ्या शेतकरी, माझ्या गरीब बांधवांसमोर नतमस्तक आहे. आज मोठ्या संख्येने आमचे ओबीसी साथी, आदिवासी आले असून या सर्वांनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपबद्दल प्रचंड उत्साह दाखवला आहे.
आज प्रत्येक गरीब माणूस म्हणतोय की, तो स्वतः निवडणूक जिंकला आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक वंचित आणि आदिवासी या विचाराने आनंदी आहेत की हा विजय आपण ज्याला मतदान केले त्याचाच आहे. माझे पहिले मतच माझ्या विजयाचे कारण ठरले, असे पहिल्यांदाच प्रत्येक मतदार सांगत आहेत. या विजयात प्रत्येक महिला आपला विजय पाहत आहे. भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाईला त्यांचा विजय दिसत आहे. आज मी विशेषत: देशातील स्त्रीशक्तीचे अभिनंदन करेन.
भाजपचा झेंडा फडकत ठेवण्याचा निर्धार करून नारीशक्ती बाहेर पडल्याचे मी प्रत्येक सभेत म्हणायचो. आज नारीशक्ती वंदन कायद्याने देशातील मुली आणि भगिनींच्या मनात नवा आत्मविश्वास जागवला आहे.
या निवडणुकीत भाजपच्या विजयाची जबाबदारी भगिनींनी घेतली होती. आज मी त्यांना नम्रपणे सांगेन की भाजपने तुम्हाला दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण होतील आणि ही मोदींची हमी आहे. आणि मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी.
या निवडणुकीच्या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, देशातील तरुण पिढीला फक्त विकास हवा आहे. ज्या सरकारांनी तरुणांच्या विरोधात काम केले त्यांना सत्तेतून बाद केले आहे. छत्तीसगड असो, राजस्थान असो वा तेलंगणा. भाजपचे सरकार युवास्नेही आहे, हे देशातील तरुणांना माहीत आहे. त्यातून तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत.
विचारधारेची लढाई सुरूच राहणार : राहुल गांधी
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोरम या पाच राज्यांपैकी चार राज्यांची मतमोजणी पार पडली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात भाजपला विजय मिळाला तर, तेलंगाणा राज्यात काँग्रेसने विजय मिळवला. या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुल गांधी यांनी निकालाचा स्वीकार करत आहोत, विचारधारेची लढाई सुरुच राहणार आहे, असे म्हटले.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनादेश आम्ही विनम्रतापूर्वक स्वीकारत आहे. विचारधारेची लढाई आम्ही सुरु ठेवणार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले. तेलंगाणामधील लोकांना धन्यवाद देतो, प्रजालू तेलंगाणा बनवण्यासाठी आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे राहुल गांधी म्हणाले. सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, असे राहुल गांधी म्हणाले.