विद्यार्थ्यांनी सर्वच भूमिका पार पाडत शिक्षकांप्रती व्यक्त केली ‘कृतज्ञता’
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी :
येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त शिपाई पदापासून ते मुख्याध्यापक पदापर्यंतच्या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांसह महात्मा फुले शिक्षण संस्था आणि ग्रामपंचायतीने गुरुजनांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव घोंगडे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, माजी सरपंच माधवराव घोंगडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. व्ही. घोंगडे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांमधून मुख्याध्यापक पदाची धुरा दहावीची विद्यार्थिनी स्नेहल सपकाळ हिने तर उपमुख्याध्यापक पदाची जबाबदारी प्रांजली धनगर हिने पार पाडली. एक दिवसासाठी शिक्षकांची भूमिका मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
पाचवी ते दहावीपर्यंत सर्व वर्गांना विद्यार्थ्यांनी अध्यापन केले. वर्ग आणि शाळा परिसराची स्वच्छता, घंटा वाजविणे, फिरती हजेरी घेणे, तास निरीक्षण, रिक्त तासिकांचे नियोजन आदी सर्वच भूमिका विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांसह महात्मा फुले शिक्षण संस्था आणि पहूर कसबे ग्रामपंचायतीच्यावतीने शिक्षकांना स्नेहवस्र, गुलाबपुष्प आणि पेन भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी रोनक सिंग, रिया सटाले यांनी इंग्रजीतून तर ममता तडवी, भाग्यश्री घोंगडे, श्रावणी लोहार, स्नेहल लहासे आदी विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून विचार प्रकट केले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झालेल्या श्रद्धा बनकर व वैष्णवी किटे या विद्यार्थिनींचीही भाषणे झाली. त्यांना उपस्थित मान्यवरांनी रोख बक्षिसे देऊन सन्मानित केले. याप्रसंगी बाल चित्रकला स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या चित्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा शिक्षक हरिभाऊ राऊत, राजेंद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शंकर भामेरे यांनी स्वरचित कविता सादर केली. यावेळी पर्यवेक्षिका कल्पना बनकर, ज्येष्ठ शिक्षिका माधुरी बारी, बी. एन. जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या यांनी साकारल्या भूमिका
शिक्षक दिनानिमित्त खुशी घोंगडे, गौरव गव्हाळे, कुश उबाळे, रुद्र उबाळे, गायत्री जवखेडे, गायत्री पवार, भावेश निकम, अयान पिंजारी, नंदिनी क्षीरसागर, जयश्री दांडगे, गायत्री मोहणे, ऐश्वर्या प्रजापत, वृषभ चौधरी, पवन माळी, हरीष चौधरी, शक्ती सुन्ने आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका साकारल्या. सूत्रसंचालन हर्षाली जाधव तर प्रतीक्षा गोंधनखेडे यांनी आभार मानले.
