एमआयडीसी पोलिसात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
तालुक्यातील लोणवाडी गावात जुन्या भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता लोणवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर घडली होती. त्यात मिलींद हिरालाल धाडी आणि त्यांचे वडील हिरालाल धाडी यांना गंभीर मारहाण केली आहे. याप्रकरणी सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविस्तर असे की, फिर्यादी मिलींद हिरालाल धाडी (वय २२, रा. लोणवाडी, ता.जळगाव) हे ७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आपल्या शेतात जात होते. तेव्हा त्यांना लोणवाडी ग्रामपंचायतीसमोर तिघांनी थांबविले. विक्रम साहेबराव चव्हाण, दशरथ साहेबराव चव्हाण आणि हेमराज साहेबराव चव्हाण अशा तिघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मिलींद धाडी यांना चापट्या-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मिलींदचे वडील हिरालाल धाडी हे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी झाले होते. संशयित आरोपी विक्रम चव्हाणचा राग अनावर झाल्याने जमिनीवर पडलेला दगड उचलून त्याने हिरालाल चव्हाण यांच्या डोक्यात मारला. ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
दगडफेकीसह शिवीगाळ करत पिता-पुत्रांना धमकी
इतर दोन संशयित आरोपी दशरथ चव्हाण आणि हेमराज चव्हाण यांनीही दगडफेक करत पिता-पुत्रांना शिवीगाळ केली. त्यांना ‘तुम्हाला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या पिता-पुत्रांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.