दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, शहर पोलिसात गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील एसएमआयटी कॉलेज परिसरात तरूणाच्या घरासमोर पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी, १३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यात दोन चोरटे दिसून आले. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ललित रमन साठे (वय ३४, रा. एसएमआयटी कॉलेज परिसर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह याच भागात वास्तव्यास आहेत. १२ डिसेंबर रोजीच्या रात्री त्यांनी आपली मालकीची कार (क्र. एमएच १९ वाय ७७०७) नेहमीप्रमाणे घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान, १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे दुसऱ्या एका कारमधून घटनास्थळी आले. त्यांनी आपली कार साठे यांच्या घरापासून काही अंतरावर उभी केली. त्यानंतर दोघेही चोरटे सावधपणे पायी चालत ललित साठे यांच्या कारजवळ पोहोचले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यानुसार, चोरट्यांनी अत्यंत चलाखीने साठे यांच्या घरासमोर लावलेल्या कारचा दरवाजा उघडला. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या आत त्यांनी गाडी सुरू केली आणि मध्यरात्री २ वाजून २ मिनिटांनी वेगाने कार घेऊन ते पसार झाले. म्हणजे, चोरट्यांनी अवघ्या चार मिनिटात ही महागडी कार चोरून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाली आहे.
दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर ललित साठे यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ जळगाव शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी १४ डिसेंबर रोजी ललित साठे यांनी फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, जळगाव शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर दोन अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
