साईमत, जामनेर : प्रतिनिधी
येथील वाकी रस्त्यावरील बेस्ट बाजाराच्या प्रांगणात लॉर्ड गणेशा इंग्लिश मेडीयम स्कूल आणि बोहरा परिवार यांच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सांगली येथील प्रख्यात स्पीकर वसंत हंकारे यांचे ‘चला बाप समजाऊन घेऊ या’ व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी व्याख्यानाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष बोहरा (राजू बोहरा), पोलीस निरीक्षक किरण शिंदे, लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अभय बोहरा, दीपक पाटील यांच्यासह बोहरा परिवाराचे सदस्य, शहरातील नागरिक, महिला, मुलींची उपस्थिती लक्षणीय ठरली.
व्याख्यानात मुली आणि मुले यांच्या जीवनात आई, बापाची त्यातल्या त्यात बापाच्या मनाची घालमेल तारुण्यात पदार्पण करणाऱ्या आपल्या मुला-मुलींच्या बाबतीत काय असते. कसे त्यांना लहानाचे मोठे केलेले असते आणि बालवयातच त्यांचे पाऊल चुकल्यावर आपण मुलांवर संस्कार घडविण्यावर कुठे कमी पडलो असेल या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांच्या मनाची घालमेल व मुलांना बापाला आपल्या जीवनात किती अनन्य साधारण महत्व आहे. हे पटवून देण्यात व्याख्याते वसंत हंकारे यशस्वी झाले आहेत. उपस्थित मुलींनी स्पीकर वसंत हंकारे यांना आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागणार नाही, अशी ग्वाही दिली.
सुरुवातीला पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले की, जामनेर शहराचे नाव शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे शहरातील शाळांसह कॉलेजमध्ये असेच संस्काराचे कार्यक्रम नेहमीच व्हायला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.