अनेकांनी सोहळा केला मोबाईलच्या ‘कॅमेऱ्यात कैद’
साईमत/जामनेर /प्रतिनिधी :
शेकडो वर्षांपासूनची परंपरा जोपासत जामनेर शहरातील माळीगल्ली परिसरात पाचोरा रोड ते गांधी चौक तर बजरंग पुरा भागातील १४ वर्षानंतर मार्गात बदल करुन पोलीस स्टेशन समोरुन ते भुसावळ रोड तसेच श्रीराम पेठ भागातील दसरा मैदानावरील मंमादेवी ते हनुमान मंदिर जवळील श्रीराम मंदिरापर्यंत बारागाड्या ओढण्याची प्रथा आजच्या युगात टिकून आहे. बारागाड्याचा सोहळा अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला.
शहरातील श्रीराम पेठ भागातील पुरातन काळातील “खंडेराव महाराज” यांचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पोळ्यांच्या दुसऱ्या दिवशी बारागाड्या ओढल्या जातात. मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात भव्य दिव्य सोहळा साजरा केला जातो. आजच्या इंटरनेट युगात किंचीतही बारागाड्याचा सोहळा कमी झालेला दिसून येत नाही. तसेच जामनेर वासियांकडून परंपरा आजतागायत टिकवली जात आहे. डोळ्यांचे पारणे फिटेल, असा उत्सव बघण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच शहरातून नागरिकांचा महासागर उसळला होता. नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन केले होते.
पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त
यासाठी जामनेर नगरपरिषदेच्यावतीने दिवाबत्ती व आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले. बारागाड्या उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पो. नि. मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.