मेहरुण तलावावरील गणेश घाटावर लाडक्या ‘गणरायाला’ निरोप
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या दहा दिवसांपासून घराघरात विराजमान राहून भक्तीचा उत्सव रंगवणाऱ्या लाडक्या गणरायाला मेहरुणमधील गणेश घाटावर शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. उत्साह, भक्तिभाव आणि विरह यांच्या संगमाने घाट परिसर दुमदुमला होता. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…!’ असा जयघोष सर्वत्र दणाणून ‘बाप्पांचे’ शांततेत विसर्जन करण्यात आले.
गणेश घाटावर सकाळपासूनच पुरुष, महिला आणि चिमुकल्यांनी हजेरी लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांनी सजवलेल्या मखरातून बाहेर पडलेले गणरायाचे रूप भक्तांना मंत्रमुग्ध करत होते. चिमुकल्यांमध्ये एक वेगळीच भावना दिसून आली. “माय फ्रेंड गणेशा”ला निरोप देताना त्यांचा चेहरा कधी आनंदी तर कधी डोळ्यात अश्रूंचा थेंब घेऊन भावुक दिसत होता. काही चिमुकल्यांनी स्वतः शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार केली होती. अशा मूर्तींचे विसर्जन करताना त्यांनी बाप्पाशी जिव्हाळ्याचे नाते जोडल्याचे स्पष्ट दिसून आले. पालकही आपल्या मुलांच्या भावना समजून घेत त्यांच्या हातून विसर्जन प्रक्रिया पार पाडत होते. आजी-आजोबा, आई-वडील आणि नातवंडे अशा तीन पिढ्या एकत्र येऊन हा क्षण अनुभवत होत्या. घाटावर विविध आकार, रंगांसह सजावटीची घरगुती गणेशमूर्ती आल्याने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. काही नागरिक मूर्तींचे विसर्जन करण्याआधी थोडा वेळ थांबत दर्शन घेत होते. पारंपरिक वेशभूषा केलेले अनेकजण, हातात आरतीची थाळी घेऊन विसर्जन स्थळी येताना दिसले. वातावरणात गुंजणाऱ्या मंत्रासह आरत्यांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
भावनिक अन् भक्तिपूर्ण निरोप
हा विसर्जन सोहळा केवळ धार्मिक विधी न राहता, समाजातील एकात्मतेचे आणि सांस्कृतिक मूल्यांचे प्रतीक बनला. घरगुती बाप्पाच्या रूपाने दरवर्षी एकत्र येणाऱ्या परिवारासह शेजारी आणि मित्रपरिवाराने बाप्पाला निरोप देताना एकमेकांप्रती आपुलकीही व्यक्त केली. गणेश घाटावरचा हा भावनिक आणि भक्तिपूर्ण निरोप सोहळा जळगावच्या गणेशोत्सवाचा अविस्मरणीय क्षण ठरला. घरगुती गणरायांच्या विसर्जनाने शहरात भक्ती आणि विरहाचा सुर एका सुरेल लयीत गुंजल्याचे चित्र होते.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे निर्माल्य संकलन
यंदाच्या गणेशोत्सवाच्या समाप्तीनंतर शहरात पर्यावरणाची काळजी घेत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने एक अभिनव ‘निर्माल्य संकलन’ मोहीम राबवली. गणेश विसर्जन झाल्यानंतर शहराच्या प्रमुख चौकांमध्ये आणि विसर्जन घाटांवर जमा होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रतिष्ठानचे १०० ते १५० स्वयंसेवक सज्ज झाले होते. ही मोहीम शहरातील स्वच्छतेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल ठरली.
पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
ही मोहीम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी शहराच्या विविध भागात राबविल्यामुळे सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आला. त्यात सागर पार्क, काव्यरत्नावली चौक, पांढरी चौक, गणेश घाट आणि वेरूळ यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश होता. प्रत्येक ठिकाणी सुमारे १०० ते १५० स्वयंसेवकांचे गट तयार केले होते. त्यांनी विसर्जन घाटांवर आणि रस्त्याच्याकडेला जमा झालेले निर्माल्य अन्य धार्मिक वस्तू गोळा करून त्या योग्य ठिकाणी पोहोचविण्याचे कार्य केले. त्यामुळे विसर्जन स्थळांची स्वच्छता राखण्यास मोठी मदत झाली. तसेच प्रतिष्ठानने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यांच्या कार्यामुळे नागरिकांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्रतिसाद
जळगाव महानगरपालिकेतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची जाणीव ठेवत सागर पार्क येथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती. त्यामार्फत नागरिकांना नदी-नाल्यांमध्ये मूर्ती विसर्जन न करता सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पांचा निरोप देता यावा, यासाठी विशेष उपाययोजना केली होती. अशा उपक्रमाला जळगावकरांनीही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. मनपाच्या आरोग्य विभागाने याठिकाणी तीन ते चार ट्रॅक्टरच्या साहाय्याने घराघरातून गणेश मूर्ती संकलित करण्याची व्यवस्था केली होती. मूर्तींबरोबरच निर्माल्य संकलनाचाही उपक्रम राबविण्यात आला. ही व्यवस्था पार पाडताना आरोग्य विभागातील कर्मचारी अनिल करोसिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण गणेशोत्सव काळात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत विसर्जनाची योग्य पद्धत समजावून सांगितली आणि कृत्रिम तलावाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. काही परिवाराने संपूर्ण परिवारासह उपस्थित राहून पारंपरिक मंत्रोच्चारासह आरती करत भावनिक वातावरणात विसर्जनाची प्रक्रिया पार पाडली. गणेशोत्सवातील विसर्जनासाठी पर्यावरणपूरक पर्याय देण्यासाठी जळगाव मनपाने उचललेले पाऊल अत्यंत स्तुत्य ठरले आहे. उपक्रमाला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद भविष्यातील पर्यावरणपूरक सणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
मानाच्या गणपती पूजनाने विर्सजन मिरवणुकीस सुरुवात
जळगाव शहरात पारंपरिक मिरवणुकीसह गणेश विसर्जनाचा सोहळा उत्साहात पार पडला. मानाच्या गणपती पूजनाने झाली. मनपाच्या मानाच्या गणपतीला आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. मनपा, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांनी संयुक्तरित्या विसर्जन मिरवणुकीसाठी सुरळीत आणि सुरक्षित व्यवस्था उभी केली होती. शनिवारी सकाळी १० वाजता मानाच्या गणपतींची मिरवणूक शिवतीर्थ मैदानावरून प्रारंभ झाला.आरतीनंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक पुढे निघाली. या मार्गांमध्ये कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, मनपा, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, भीलपुरा चौक, सराफ बाजार, पांडे चौक, सिंधी कॉलनी आणि शिरसोली नाका यांचा समावेश होता. विसर्जनाच्या संचलनावेळी प्रत्येक गणेश मंडळास दोन गणरक्षक नेमण्यात आले होते. मिरवणुकीचा सुयोग्य समन्वय राखण्यासाठी गणरक्षक कार्यरत होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपाने आपत्कालीन कक्ष सुसज्ज ठेवला होता.
सुरक्षेसाठी १०० जीवरक्षकांसह १५ जलतरणपटूंची टीम
भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जयप्रकाश नारायण चौक (नटवर चौक) येथे एक वैद्यकीय सेवा केंद्र उभारण्यात आले होते. येथे १५ डॉक्टर, रुग्णवाहिका आणि औषधांची उपलब्धता होती. तसेच महिलांसाठी मार्गावरील हॉटेल्सची स्वच्छतागृहे खुली ठेवण्याचे निर्देश दिले होते. पुरुषांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली होती. महामंडळाच्या सूचनेनुसार रात्री ८ वाजता संपूर्ण मिरवणूक मार्गावर एकाचवेळी महाआरती करण्यात आली. विसर्जन प्रक्रियेत शिस्त राखण्यासाठी आणि पाण्यातील सुरक्षेसाठी १०० जीवरक्षक आणि १५ जलतरणपटूंची टीम सज्ज ठेवण्यात आली होती.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी ७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे
मनपाने गणेश मूर्ती विसर्जनासाठी मेहरुण तलाव परिसरात दोन ठिकाणी व्यापक व्यवस्था केली होती. मेहरुण तलावावरील गणेश घाट येथे घरगुती आणि लहान मूर्तींसाठी ५ लाकडी तराफे, जीवरक्षक बोट आणि ४५ कर्मचाऱ्यांचे पथक होते. दुसरे ठिकाण सेंट टेरेसा हायस्कूलच्या पुढे ठेवले होते. तेथे ५ तराफे, ४ क्रेन, २ राखीव क्रेन आणि ४५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ सज्ज होता. संपूर्ण व्यवस्थेवर १३ अभियंत्यांची जबाबदारी निश्चित केली होती. याशिवाय पर्यावरण पूरक विसर्जनासाठी ७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. त्यामध्ये महानगरपालिका लाठी शाळा, पांझरा पोळ शाळा, सागर पार्क, पिंप्राळा शाळा, निमखेडी, नाभिक समाज सभागृह (शिवाजीनगर) आणि श्री साईबाबा मंदिर (मेहरुण) यांचा समावेश होता.