खा.वाघ यांचे प्रयत्न अन् तत्परता ठरली फलदायी…!
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
सुपर फास्ट नागपूर-पुणे १२ कोच असलेली वातानुकुलीत ‘वंदे भारत’ रेल्वे एक्स्प्रेस रविवारी, १० ऑगस्टपासून सुरु झाली. अशा सुपर फास्ट रेल्वे ट्रेनची जळगाव जिल्ह्यात मोठी उत्सुकता होती. ती उत्सुकता अखेर रविवारी पूर्ण झाली. पण सुपर फास्ट आणि लांब पल्ल्याच्या ट्रेनला भुसावळनंतर जळगावला थांबा मिळाला कसा…? असा प्रश्न जाणकार प्रवासी आणि खुद्द स्थानिक रेल्वे प्रशासनात चर्चिला गेला.
‘वंदे भारत’ ट्रेनला जळगाव स्थानकावर थांबा देण्याचे सुरवातीच्या वेळापत्रकात नियोजित नव्हतेच. किंबहुना जळगावच्या थांब्याचा विषयच नव्हता. पण जळगाव लोकसभेच्या खा.स्मिताताई वाघ यांनी साधारणपणे १५ दिवसांपूर्वी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या कार्यालयात भेट घेतली. खा.वाघ यांनी विनंती केली की, ‘वंदे भारत’ ला आपण भुसावळ थांबा दिला आहे. पण भुसावळ हे रेल्वे विभागाचे जंक्शन आहे आणि भुसावळ तालुक्याचे शहर आहे. जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. जळगावात मोठी औद्योगिक वसाहत, विद्यापीठ, व्यापार, उद्योगासह शिक्षण, कृषी क्षेत्राचे मोठे ठिकाण आहे. भुसावळपेक्षाही कितीतरी जास्त प्रवासी जळगावहून असतात. ‘वंदे भारत’ ला जळगाव स्थानकावर थांबा मिळावा, ही त्यांची अपेक्षा आहे.
जळगावचे महत्त्व त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पटवून दिले आणि जळगावला थांबा न मिळाल्यास प्रवाशांवर अन्याय होईल, असे सांगत त्यांनी जळगावला थांबा देण्याची आग्रहपूर्वक मागणी केली. रेल्वे मंत्र्यांनाही त्यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाला सांगितले की, तुमच्या यादीत जळगावला थांबा दिलेला नसेल तर तो आत्ताच्या आता ‘वंदे भारत’ गाडीला जळगाव स्थानकावर थांबा दिल्याचे आदेश जारी करावेत. मंत्र्यांच्या आदेशवजा सूचनांची तात्काळ अंमलबजावणी केली आणि गाडीला जळगाव स्थानकावर थांबा मिळाला. यातील विशेष बाब की, ट्रेनच्या पूर्ण प्रवासात २० किलोमीटरवर थांबा असणारे जळगाव एकमेव रेल्वे स्थानक आहे. खा.वाघ यांनी याविषयी केलेले प्रयत्न आणि तत्परता फलदायी ठरली, हेही तेवढेच खरे आहे.