सिंधी बांधवांसह देशभरातील भाविकांचा दुहेरी आनंद अन् उत्साह
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या ४८ वर्षांपासून सुरू असलेला संत बाबा हरदासराम साहेबांचा ‘वर्सी महोत्सव’ अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे आजपासून जळगावातील सिंधी कॉलनीत साजरा होत आहे. त्याचसोबत त्यांचे गुरु संत कंवरराम साहेब यांचा ६८ वा वर्सी महोत्सव आणि संत बाबा हरदासराम यांचे शिष्य यांचा १७ वा वर्सी महोत्सवही याच काळात साजरा होत आहे. महोत्सवासाठी सिंधी कॉलनी सेवा मंडळ येथे भव्य मंडप उभारणी केली आहे. संपूर्ण परिसरात ट्रस्टच्यावतीने आकर्षक विद्युत रोशनाई केली आहे. चार मजली नवीन इमारत तयार झाली आहे. त्यात ५७ रूम आणि ४ मोठे सभागृह आहेत. अशी सहा मजली इमारत तयार झाली आहे. त्यामुळे जळगाव सिंधी समाजातील बांधव तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांचा आनंद आणि उत्साह दुहेरी झाला असल्याचे ट्रस्टचे अशोक मंधाण यांनी सांगितले.
शुक्रवारी होणारे महत्त्वाचे कार्यक्रम असे :
शुक्रवारी, १० ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता संत बाबा हरदासराम साहेब, बाबा गेलाराम साहेब यांची देवरी साहेब (समाधी) पंचामृत स्नान. बाबा हरदासराम साहेब, बाबा गेलाराम साहेब यांची महाआरती. धुळे येथील आर्य समाज मंदिराचे प्रमुख लेखराज आर्य यांचे सुपुत्र यांच्या हस्ते होम-हवनाचा कार्यक्रम, बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य भाई देवीदास यांच्या उपस्थितीत सुमारे ८० जोडपे हवनात सहभागी होणार आहेत. सर्वत्र सुख-शांती लाभून धन-धान्याची भरभराट व्हावी, परिवारात यश-उन्नती प्राप्त व्हावी, यासाठी होम हवनाचा कार्यक्रम होतो. सकाळी ११ वाजता भाविकांसाठी उभारलेल्या मंडपातील ऑफिस उद्घाटन, सायंकाळी ५ वाजता महिला भगिनींचा सत्संग कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता अखंड पाठ साहेबाची सुरुवात. यावेळी पहिल्यांदाच संपूर्ण रामायणाचे वाचन सिंधी बांधवांकडून होईल. रात्री संतबाबा हरदासराम साहेब, संतबाबा गेलाराम साहेब यांच्या जीवनावर आधारित भजन आणि कंवरनगर परिसरातील व बाहेरून आलेल्या गायक-कलाकारांतर्फे नाटिका कार्यक्रम सादर होणार आहे.
देशभरातून भाविकांचा सहभाग
दरवर्षी वर्सी महोत्सवाला संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, राजस्थान राज्यामधील अनेक शहरातील भाविक येतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ट्रस्टकडून जळगाव रेल्वे स्टेशनवर भव्य स्वागत मंडप उभारले आहे. भाविकांसाठी चहा, पाणी व बिस्कीटची व्यवस्था गुरुवारी, ९ ऑक्टोबरपासून रेल्वे स्टेशन स्वागत समितीने सुरू केली आहे. हा महोत्सव सिंधी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा ठरणार आहे. तसेच भाविकांचा उत्साह आणि भक्तीचे वातावरण निर्माण करणारा आहे. गेल्या एका महिन्यापासून ट्रस्टचे पदाधिकारी, सदस्य, पूज्य पंचायतचे पदाधिकारी, जळगाव शहरातील बाबांचे सेवेकरी वर्ग, महिला मंडळ आणि सिंधी कॉलनीतील सर्व मंदिरांचे ट्रस्टी, पदाधिकारी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.