विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव ; शिस्त, एकतेसह परेडचा संगम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय छात्र सेनेतर्फे ‘बेस्ट परेड (मार्च पास)’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अभिनव संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
‘एकता आणि अनुशासन’ अशा एनसीसीच्या ब्रीदवाक्याला अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, समन्वय आणि संघभावना वृद्धिंगत करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या शालेयसह महाविद्यालयीन पथकांना ‘जळगाव डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी’ प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यात एनसीसी विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची स्पर्धा होणार ही पहिलीच वेळ आहे. दरवर्षी अशा उपक्रमाचे आयोजन करून विजयी पथकाला फिरती ट्रॉफी देण्यात येईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये स्पर्धेचा पहिला सोहळा पार पडणार आहे. त्याचे आयोजन १८ महाराष्ट्र बटालियन जळगावातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यासाठी एक नवा आदर्श उपक्रम ठरणार
जिल्हाधिकाऱ्यांनी उपक्रमाची अधिकृत घोषणा करुन ‘बेस्ट मार्चिंग कंटिंजंट–डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ट्रॉफी’ विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रीय भावना दृढ करेल. हा उपक्रम जळगाव जिल्ह्यासाठी एक नवा आदर्श ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. याप्रसंगी १८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अश्विन वैद्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
