Women’s Dahi Handi Festival : जळगावात तरूणींच्या दहीहंडी उत्सवासाठी १७ वर्षात यंदा ११ संघ ५ थरांपर्यंत सराव

0
16

एका संघात ७० ते ८० गोपिका, ५०० युवती प्रात्यक्षिकेही सादर करणार

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशनतर्फे शनिवारी, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान सागर पार्कवर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असतील. त्यासाठी ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गेल्या १७ वर्षांपासून महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी सुरू आहे. अशा उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे. गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. तसेच शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद अशा ढोलपथकाचे ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी सुमारे २० हजारांवर जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित राहत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अशी असतील गोपिकांची ११ पथके

गोपिकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच ११ युवतींचे पथके येणार आहेत. त्यात किडस् गुरूकुल शाळा, नूतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲड.एस. ए. बाहेती महाविद्यालय, केसीई सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टिट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. आदी पथकांचा समावेश आहे.

युवतींना हक्काचे मिळाले व्यासपीठ

संपूर्ण महाराष्ट्रातून युवतींची ही एकमेव दहीहंडी आहे. युवतींच्या दहीहंडीचे हे १७ वे वर्ष आहे. दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे तरूणींचा सहभाग वाढावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही दहीहंडी सुरू केली आहे. त्यात यंदा तब्बल ११ संघ सहभागी झाल्याने हा संघ यशस्वी होत आहे. मानवी मनोरे बनविणे या खेळाला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. लवकरच हा खेळ शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जाईल.

-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here