स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…!
साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :
येत्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे, तशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या घोषणेनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्थानिक निवडणुकीसाठी चर्चेसह तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दै.‘साईमत’ने ‘स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक वेध राजकीय स्थितीचा…’ अशी वृत्त मालिका सुरु केली आहे. जिल्ह्याची विद्यमान राजकीय स्थिती लक्षात घेता शिवसेना (शिंदे गट) राज्याच्या सत्तेत असलेला पक्ष आहे. या पक्षाचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. याच पक्षाचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे गुलाबराव पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पक्षाचे नेते आणि वक्तृत्व शैलीमुळे ‘मुलुख मैदान’ तोफ अशी त्यांची राज्यभर ओळख आहे.
शिवसेनेत गेल्यावेळी फुट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे यश जिल्ह्यात संपादित केल्याचे दिसून येते. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने विचार या पक्षाला आपले अस्तित्व अथवा प्रभाव निर्माण करावयाचा आहे. राज्याच्या सत्तेच्या राजकारणात हा पक्ष भाजपाचा मित्र पक्ष असला तरी स्थानिक निवडणुकीत ही मैत्री कितपत कायम राहील आणि राहिली तरी त्यात वाटा किती असेल…? हे आताच सांगणे अवघड आहे. शिवसेना शिंदे गटाने २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल पाच जागांवर विजय मिळविलेला असला तरी त्यात भाजपाच्या मैत्रीचा उपयोग झाल्याचाच तो परिणाम म्हणता येईल. असे असले तरी या पक्षाच्या प्रत्येक आमदारांचा आपापल्या मतदार संघात लक्षणिय प्रभाव आहे. आमदारांना मानणारा मोठा वर्ग ही त्यांच्यासोबत आहे, ही या पक्षाची जमेची बाजू आहे. मात्र, स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत बदलणाऱ्या राजकीय स्थितीचा ते आपल्या पक्षाच्या बाजूने कसा उपयोग करुन घेतात, याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.
पक्षाची संघटनात्मक रचना बघता दोन जिल्हाप्रमुख आणि एक संपर्क प्रमुख आणि एक संपर्क नेता यांच्या हातातच पक्षीय संघटनेची सूत्रे असणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याच्या दोन मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जळगाव महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा प्रभाव कसा उमटवितात. यावरच त्यांची राजकीय अस्तित्वाची ‘मदार’ अवलंबूधन असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मित्र पक्षांचा ‘फार्म्युला’ कसा असेल…? याविषयी अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेले नाही.
आगामी निवडणुकीत पक्षाचा ‘अजेंडा’ काय असेल…?
जळगाव मनपाबद्दल बोलायचे झाल्यास सद्यस्थितीत त्यांचे १७ माजी नगरसेवक आहेत. त्यांचा आपापल्या प्रभागात, वार्डात जनसंपर्क चांगला आहे. तसेच बहुतेक सर्व माजी नगरसेवक पक्षाची निष्ठा ठेवून आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचा ‘अजेंडा’ काय असेल…?, कोणते राजकीय डावपेच ते आखतील…? त्यावरच बरेच काही अवलंबून असणार आहे, हेही तेवढेच खरे…!