Nationalist Congress Party (Sharad Pawar) : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात ज्येष्ठ अन्‌ अभ्यासू नेते, पण बदललेल्या राजकीय प्रवृत्तीवर मात कशी करावी?

0
28

स्थानिक निवडणुका…वेध राजकीय स्थितीचा…!

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जे पक्ष दुभंगले आहेत किंवा दोन गट पडले आहेत, अशा पक्षांना आपला प्रभाव जनमानसात निर्माण करण्याचे आव्हान मोठे आहे. त्यात शरद पवार प्रणित राष्ट्रवादी पक्षासाठी स्थानिक निवडणुकीत आपले पक्षीय बल सिध्द करण्याची ही एक परीक्षाचं ठरावी, असे सध्याचे तरी चित्र आहे. तथापि, या पक्षाची जिल्ह्यातील सर्वाधिक जमेची बाजू अशी आहे की, या पक्षात दीर्घकाळ राजकीय पटलावर आपला ठसा उमटविलेल्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नेत्यांची कमी नाही. पण अभ्यासू ज्येष्ठ नेत्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मर्यादाही आहेत. राजकीय प्रवृत्तीत आणि कालानुरुप झालेल्या बदलाला ज्येष्ठ मंडळी कशा पध्दतीने सामोरे जाते, यावरच या पक्षाचे ‘यशापयश’ अवलंबून आहे.

जिल्ह्याच्या सध्याच्या राजकीय स्थितीत जे काही बदल झाले आहेत, त्यात ‘अर्थ’पूर्ण निती महत्त्वाची ठरु लागली आहे. एकसंघ राष्ट्रवादी पक्षाची दोन शक्कले झाल्यानंतर जी काही स्थिती समोर आली आहे, त्यात पक्षाची शक्ती विभागली गेली आहे, अशा विभागलेल्या शक्तीतून घवघवीत यश संपादन करणे तसे मोठे आव्हानात्मकच आहे. गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील लढतीत या पक्षाला जिल्ह्यातील एकही लोकसभेची जागा जिंकता आलेली नाही. तथापि, जामनेर आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात या पक्षाने लक्षवेधी लढत दिली. जय-पराजया पलीकडे जावून विचार केला तर या दोन मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) उमेदवारांनी मिळविलेली मते आशादायी चित्र निर्माण करण्यासारखी आहेत.

जळगाव ग्रामीण आणि पारोळा-एरंडोल मतदार संघातील या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव मात्र वेगळा संदेश देणारा होता. जळगाव जिल्हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मनापासून मानणारा जिल्हा आहे. पण मान्यता मतात परिवर्तन का होत नाही…?, हा खरा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप काहीही चित्र स्पष्ट नाही. बहुधा महाविकास आघाडीच्या बाजूने अधिक विचार करणारा हा पक्ष असेल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या जातात किंवा नाही हे येत्या महिन्याभरात स्पष्ट होईल. पण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला प्रभाव उमटविण्याचे आव्हान या पक्षासमोरही असणार आहे, हेही तेवढेच खरे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here