साईमत जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान होत आहे. बुधवारी सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी जळगाव शहरात ९ तर जिल्ह्यात ७८ परीक्षा केंद्र आहे. सकाळी १०.३० वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या आवारात प्रवेश देण्यात आला होता. ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. या परीक्षेला जिल्ह्यातील ४८ हजार २७३ परीक्षार्थी आहेत.
पहिलाच इंग्रजी विषयाचा पेपर असून जळगाव जिल्ह्यात ४८ हजार २७३ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या आहेत. बारावी बोर्डाची परीक्षा इंग्रजीच्या पेपरने सुरू झाली. या परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. शेवटच्या दिवशी विद्यार्थी समाजशास्त्राचा पेपर लिहिणार आहेत.
ओळखपत्र आणि प्रवेशपत्र सोबत ठेवणे अनिवार्य
बोर्डाच्या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र सोबत सोबत ठेवावे लागेल. प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. यंदा विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी १० मिनिटेही मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला होता.
“फसवणूक मुक्त परीक्षा” मोहिमेवर भर देऊन निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी मंडळाने कडक व्यवस्था केली आहे. परीक्षा हॉलमध्ये मोबाइल फोन, ब्लूटूथ उपकरणे आणि स्मार्ट घड्याळे यासारखी इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. विद्यार्थ्यांना फक्त आवश्यक स्टेशनरी वस्तू आणण्याची परवानगी आहे.
यात बारावीची परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च पर्यंत घेण्यात येणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयाची ऑनलाइन परीक्षा दि. २० ते २३ मार्च, तर दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च २०२४ या दरम्यान होणार आहे.
जळगाव जिल्ह्यात बारावीसाठी ७८ परीक्षा केंद्रे असून, ४८ हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात २७ हजार ७६८ विद्यार्थी, तर २० हजार ५०५ विद्यार्थिनी असल्याची माहिती माध्यमिक विभागाकडून देण्यात आली.
प्रत्येक तालुक्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक केंद्रावर १ बैठे पथक, जि. प. सीईओ यांच्यामार्फत विभाग प्रमुखांचे प्रत्येक तालुक्यात एक पथक कार्यरत राहील, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्राजवळील भागात परीक्षेदरम्यान नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जे कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.