धामणगावला गंमत जोडशब्दांची रिडींग अँड लर्निंग सेंटरमध्ये ‘वाचन प्रेरणा’ दिन साजरा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
धामणगाव येथील ‘माय माती फाऊंडेशन’तर्फे गंमत जोडशब्दांची रिडींग अँड लर्निंग सेंटर येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावेर येथील स्व. देवराम खुशाल पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली शुभेच्छा पत्रे देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांसारख्या साहित्यकार व समाजसेवकांची पुस्तके वाचून मनोगत व्यक्त केले. त्यात दीपाली सपकाळे, मोहिनी सपकाळे, समीक्षा सपकाळे, तेजस्विनी सपकाळे, गायत्री सपकाळे, ओम सपकाळे, घनश्याम कोळी, भावेश तायडे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. याप्रसंगी फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच सेंटरला पुस्तकांचा सेट भेट स्वरूपात देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक वाचनाची संधी मिळणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा उपक्रम
उपाध्यक्ष इंजि. साहेबराव पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. उपक्रमात नियमित येणाऱ्या २८ विद्यार्थ्यांसोबत प्रभावती पाटील आणि जयमाला फिरके उपस्थित होत्या. कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यास यशस्वी ठरला. शेवटी प्रभावती पाटील यांनी आभार मानले.