‘गाव चलो अभियानात’ आ.मंगेश चव्हाण यांनी ठोकला लोंजे गावात मुक्काम

0
24

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

केवळ निवडणुका आल्या किंवा लग्न समारंभ, अंत्यविधी असला तरच गावात धावती भेट ही पुढाऱ्यांची ठरलेली असते. मात्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी चक्क आमदार गावाला भेट देतात. रात्रभर मुक्कामी थांबून त्यांच्याशी संवाद साधतात. असे आजवर कधी घडले नव्हते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या ‘गाव चलो अभियानाच्या’ माध्यमातून चाळीसगाव मतदारसंघाचे आ.मंगेश चव्हाण यांनी लोंजे गावात मुक्काम ठोकला. तसेच मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. यासोबतच लोंजे, आंबेहोळ, साईनगर गावातील कोट्यावधींच्या विकासकामांचे उद्घाटनही केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत मांडण्यासाठी तसेच केलेली विकासकामे यांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे ‘गाव चलो अभियान’ राबविले जात आहे. जळगाव जिल्ह्यातही ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे बूथप्रमुखांपासून ते थेट आमदार, खासदार, मंत्री आदी लोकप्रतिनिधी यांनीही सहभागी होण्याचे व एक दिवस ग्रामीण भागात मुक्कामी राहण्याचे निर्देश पक्ष संघटनेकडून देण्यात आले होते.

ग्रामस्थांशी साधला संवाद

चाळीसगाव तालुक्यातील बूथ क्रमांक ३३८ वर स्वतः आ.मंगेश चव्हाण यांनी भेट देण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार १० फेब्रुवारी रोजी लोंजे, साईनगर गावाला त्यांनी मुक्काम केला. एवढेच नव्हे तर केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या कुटुंबाच्या घरी त्यांनी जेवण केले. गावात घरोघरी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप केले. तसेच भाजपाचे चिन्ह असलेले कमळाचे व ‘फिर एक बार मोदी सरकार’ असे भित्तीचित्रे असलेले दिवार लेखनही त्यांनी केले. थंडीचे दिवस असल्याने गावात बऱ्याच ठिकाणी शेकोटी पेटविण्यात आली होती. आ.मंगेश चव्हाण यांनी शेकोटीची ऊब घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. आपल्या पक्षाचे बूथ प्रमुख आणि लोंजे, साईनगर गावाचे सरपंच बळीराम चव्हाण यांच्या घरी त्यांनी मुक्काम केला.

सेवालाल भवन उभारण्याचे दिले आश्‍वासन

चाळीसगाव तालुक्यातील लोंजे गावातून आंबेहोळ व साईनगर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत आ. मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विभक्त केल्या होत्या. नवीन ग्रामपंचायतींचे हे पहिलेच वर्ष असल्याने त्यांना विकासकामांना निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. गेल्या ४ वर्षात आपल्या आमदारकीच्या माध्यमातून लोंजे आंबेहोळ व लोंजे साईनगर या दोन्ही गावात मंजूर असलेल्या कोट्यावधींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजनासह लोकार्पण त्यांनी केले. आमदार आपल्या गावात मुक्कामी असल्याने म्हणजे गावात एक उत्साहाचे वातावरण होते. अबालवृद्ध, महिला, माता भगिनी यांच्याशी त्यांनी संवाद साधत मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली. रात्री १० वाजता उशिरा झालेल्या संवाद सभेला शेकडो ग्रामस्थ विशेषतः माता भगिनी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही गावांना संत सेवालाल भवन उभारण्यासाठी निधी देण्याचे आश्‍वासन आ.चव्हाण यांनी दिले.

यांची होती उपस्थिती

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, माजी जि. प.सभापती राजु राठोड, कृउबा सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, पं. स.माजी उपसभापती सतिश पाटे, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, अमोल नानकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष गोरख राठोड, नमोताई राठोड, सुनील पवार, धनराज पाटील, विवेक चौधरी, कैलास पाटील, राम पाटील, राजू पगार, संजय कुमावत, लोंजेचे सरपंच बळीराम चव्हाण, आंबेहोळचे सरपंच भरत चव्हाण, जुनोनेचे सरपंच गोरख राठोड, वागलेचे सरपंच रामदास पवार, वलठाणचे सरपंच सीताराम राठोड, गोरखपुरचे उपसरपंच योगेश जाधव, चैतन्यतांडाचे सरपंच तथा चेअरमन दिनकर राठोड, शिंदीचे उपसरपंच तथा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख राठोड, बोढरेचे सरपंच गुलाब राठोड, खेर्डेचे उपसरपंच ममराज जाधव, सायगव्हाणचे माजी सरपंच बाबू राठोड, कृष्णनगरचे उपसरपंच मनोज चव्हाण, वाकडीचे सरपंच प्रकाश पाटील, रांजणगावचे सरपंच प्रमोद चव्हाण, विनीत राठोड, बबलू चव्हाण, अविनाश राठोड, वाडीलाल राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग २११ ते रांजणगाव लोंजे हा रस्ता ग्रामीण मार्ग असल्याने त्याला निधी आणता येत नाही. त्यामुळे त्याची प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती प्रस्तावित केली आहे. त्यामुळे ५ मीटर रुंद रस्ता करता येईल, अशी माहिती आ.मंगेश चव्हाण यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here