ग्रामीण रुग्णालयात रोज ५०० रुग्णांची तपासणी बालरोग तज्ज्ञांकडून…?
साईमत/यावल/प्रतिनिधी :
गेल्या दोन वर्षांपासून येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्याकडे विविध समस्यांबाबत लेखी तक्रारी, निवेदन देऊन सुख- सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने तसेच बौद्ध, दलित, आदिवासींचा जाणून-बुजून द्वेष करीत आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह महिलांना पाहिजे त्या आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने यावलच्या तहसिलदारांना वस्तुस्थिती माहिती होण्यासाठी ‘निळे निशाण’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अनिल इंधाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी यावल तहसील कार्यालयासमोर सोमवारी, १२ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात दररोज ५०० रुग्णांची तपासणी केली जात असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातर्फे ‘निळे निशाण’ संघटनेला देण्यात आली असली तरी ५०० रुग्णांची तपासणी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कशी काय करतात? तसेच रुग्णालयात गरजू महिलांना प्रसूती दरम्यान सिझर करण्याची वेळ आल्यास रुग्णालयात तज्ज्ञ स्त्रीरोग डॉक्टरांची नियुक्ती करायला पाहिजे.
नाशिक आयुक्तांच्या ‘आदेशाची पायमल्ली’
तालुक्यातील टेंभीकुरण गाव ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करण्याचा आदेश विभागीय आयुक्त यांनी १९९२ मध्ये दिलेला असला तरी अद्याप गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणजे नाशिक आयुक्तांच्या ‘आदेशाची पायमल्ली’ केली आहे. टेंभीकुरण येथील दलित, बौद्ध नागरिक, महिलांना वस्तीच्या बाहेर जाण्यासाठी कोणताही रस्ता व इतर सुख-सुविधा नाहीत.
गटविकास अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा
धुळेपाडा येथील आदिवासी बांधवांच्या अनेक समस्यांबाबतही लेखी निवेदन पंचायत समितीकडे दिलेले आहे. त्याचीही दखल गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांनी न घेतल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आदी मागण्यांसंदर्भात आणि पंचायत समितीच्या कामकाजाची वस्तुस्थिती यावल तहसीलदार यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी यावल तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले असल्याची माहिती ‘निळे निशाण’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी दिली.
आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करणार
आंदोलनात तालुकाध्यक्ष अनिल इंधाटे यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते महिला, पुरुष सहभागी झाले आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.