उमेद अभियानातंर्गंत ३ महिला बचत गटांना २४ लाख रुपये निधीचे धनादेश ; ९४६ लाभार्थ्यांना विविध योजना, दाखले वितरित
साईमत/एरंडोल/प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित महासमाधान शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून शिबिर यशस्वी केले. शिबिरात ९४६ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना आणि दाखले तात्काळ वितरित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरात खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील आणि १८ विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिबिरात २० स्टॉल्स लावण्यात आले होते. ज्यातून नागरिकांना विविध विभागांच्या योजना आणि दाखले थेट मिळवता आले.
ठळक लाभांमध्ये उमेद अभियानांतर्गत ३ महिला बचत गटांना २४ लाख रुपये निधीचे धनादेश, महसूल विभागाकडून ४७८ शैक्षणिक दाखले, भूमी अभिलेख विभागाकडून ४० लाभार्थ्यांना सनद, कृषी विभागाकडून ११८ लाभार्थ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पूर्वसंमती, पंचायत समितीकडून ५ दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी आणि ६० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप तसेच आरोग्य विभागाकडून २० लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड आणि आरोग्य शिबिराचा लाभ समाविष्ट होता. शिबिरामुळे नागरिकांना विविध योजना आणि दाखले एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे ते समाधानी राहिले.