प्रेतयात्रा नेण्यासाठी रस्ताही नाही, रात्री लाईटही नाही, अंधाऱ्यात प्रेतावर करावे लागताहेत अंत्यसंस्कार
साईमत/धानोरा, ता. चोपडा/प्रतिनिधी :
अंकलेश्वर -बऱ्हाणपूर या राज्य महामार्गावर आणि सातपुडा पर्वताजवळील अतिजवळचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरा गावाच्या स्मशानभूमीत मरणानंतरही ‘यातना’च भोगाव्या लागत असल्याचे येथील असुविधांमुळे दिसून येत आहे. २५ हजार लोकवस्तीच्या गावात हिंदू बांधवासाठी मरणानंतर अंतिम संस्कार करण्यासाठी बिडगाव रस्त्यावर एकच स्मशानभूमी आहे. स्मशानभुमीत प्रेतावर अंतिम संस्कार करण्यासाठी व्यवस्थित जागाही नाही. फार जुन्या असलेल्या स्मशानभूमीचे छत केव्हा कोसळेल, हे सांगता येत नाही. त्याच बाजुला नवीन बांधकाम केलेले व्यवस्थित नाही, स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटेने जावे लागते. पावसाळ्यात अत्यंयात्रेचा प्रवासही यातनामय होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते.
स्मशानभूमीच्या आवारात मोठ-मोठी काटेरी, झाडे, झुडपे आहेत. अंत्यसंस्कारानंतर राख, कोळसा, लाकडे, मृताचे कपडे असे विविध प्रकारचे साहित्य पडलेले असते. पावसाळ्यात शेजारीच नाला वाहत असल्याने, उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री अंतीम संस्कार करावयाचे म्हटल्यास याठिकाणी पूर्ण परिसरात अंधार पसरलेला असतो. त्यामुळे येथे जवळच राहणारे जितेंद्र रमेश तायडे (कन्हैया) यांच्याकडील तीनही सुमो गाडीच्या लाईटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागतात. यावेळी आधीच दुःखाच्या जनसागरात बुडालेल्या लोकांचा आणि नातेवाईकांचा संताप पाहता येत नाही.
धानोरा गाव शैक्षणिक, सामाजिक, राजकारण आदींबाबत तालुक्यात नावाजलेले आहे. मनुष्य जीव आयुष्यभर काबाडकष्ट करीत असतो. पै-पै साठवून परिवारासाठी चांगली कामे करीत असतो. परंतु मरण हे जगात कोणालाही न सांगता येणारे कोडे आहे. ते कोणाला कसे, कुठे, केव्हा येणार हे मात्र कळत नाही.
स्मशानभूमीसाठी जागा मिळावी
धानोरा गाव २८ हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्यात बारा बलुतेदार समाज गावात एकोप्याने नांदत आहे. बिडगाव स्मशानभूमीत काही ठराविक समाजातील, लोकांना मेल्यानंतर अग्नीडाग देतात तर काही भूमी डाग देतात. स्मशानभूमीतील दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष नसल्याने दिवसेंदिवस धानोरा स्मशानभूमीत मरणानंतरही यातनाच मिळत आहेत. आयुष्यभर काबाड, कष्ट करुन मिळवलेली संपत्ती मेल्यानंतर कोणत्याच उपयोगात अथवा कामात आपल्यासाठी येत नाही. त्यामुळे जेवढी चांगली कामे करता येतील, तेवढी कामे करावी, हाच संदेश याचनिमित्ताने द्यावासा वाटतो. ग्रा.पं.ने लक्ष देण्याची गरज धानोरा स्मशानभूमीची दुरावस्था बघता ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.