साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मैदानी खेळासोबत शरीरसौष्ठवाचे उत्तम प्रतिक असणाऱ्या शिवकालिन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच झाला. त्याच खेळांचे प्रात्यक्षिक विद्यार्थी प्रजासत्ताकदिनी सादर करणार आहे.
मुलांमध्ये मोबाईलचे वाढते आकर्षण आहे. तासन्तास ते ऑनस्क्रीन असतात. त्यामुळे मैदानी खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पारंपरिक खेळ हा शरीरसौष्ठवाचा चांगला स्त्रोत आहे. शिवकालिन मर्दानी खेळांमधून शारीरिक कसरतींना चांगला वाव मिळतो. विद्यार्थ्यांना याद्वारे थेट शिवकालिन खेळांचा परिचय व्हावा. या उद्देशाने आ.बं. विद्यालयाने नेवासेस्थित राजे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे सुरेश लव्हाटे, दिव्या चक्रनारायण, निरंजन वालतुरे यांना आमंत्रित करुन प्रशिक्षण शिबिर भरविले आहे. हे प्रशिक्षण १२ दिवस चालणार आहे.
प्रशिक्षण शिबिरात ५० विद्यार्थ्यांचा सहभाग
शिवकालिन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिरात २५ विद्यार्थी व २५ विद्यार्थिनी असे ५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहे. पुढील १२ दिवस हे विद्यार्थी मर्दानी खेळांचे धडे गिरवतील. प्रजासत्ताकदिनी शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहे. मर्दानी खेळांचे धडे देणारी आ.बं.विद्यालय ही तालुक्यातील पहिलीच शाळा आहे. मर्दानी खेळात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहे. पहिल्याच दिवशी ४० विद्यार्थी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी घडविणे हे आमचे ध्येय आहे. मात्र, त्यांची शारीरिक स्थितीही सशक्त व बळकट असावी. मानसिक व शारीरिक विकास खेळांद्वारे होतोच. शिवकालिन मर्दानी खेळ याचे चांगले उदाहरण आहे. प्रशिक्षण शिबिरात तयार झालेले विद्यार्थी पुढे इतर विद्यार्थ्यांना खेळांचे प्रशिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला आहे, असे योगेश अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी आ.बं. मुलींच्या विद्यालयाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापक के.एन.तडवी, सुलोचना इंगळे, जिजाऊ समितीच्या अध्यक्षा सोनल साळुंखे, सचिव सुजित कुमार पाटील, जयेश कुमावत, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.