चाळीसगावला एक हजार ९०२ केंद्राध्यक्षांसह अधिकाऱ्यांना प्रथम प्रशिक्षण वर्गाद्वारे दिले निवडणुकीचे धडे

0
19

२५ प्रश्न असलेली ५० गुणांची घेतली लेखी परीक्षा, निवडणूक प्रक्रियेचे स्क्रीनवर सादरीकरण

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यासाठी १७ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात २२ ऑक्टोंबरपासून अर्ज दाखल करावयाचे कामकाज सुरू झालेले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचा प्रथम प्रशिक्षण वर्ग २७ ऑक्टोबर रोजी भडगाव रस्त्यालगतच्या वैभव मंगल कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रथमेश मोहोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता. हा प्रशिक्षण वर्ग सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात पार पडला. सकाळच्या सत्रात ४१८ मतदान केंद्राध्यक्ष आणि ४१९ प्रथम मतदान अधिकारी अशा ८३७ मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या सत्रात ४२१ पुरुष आणि ६४४ महिला असे एक हजार ६५ इतर मतदान अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणात मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणूक प्रक्रियेचे स्क्रीनवर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर मतदान अधिकारी यांना असलेल्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक व मतदान यंत्र हाताळणे सर्व मतदान अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात आली. तसेच निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यानचे विविध माहितीचे नमुने प्रत्यक्ष देऊन भरून घेण्यात आले. शेवटी २५ प्रश्न असलेली ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

प्रशिक्षणात सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात एक हजार ९०२ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यापैकी एक हजार ८२४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी उपस्थित होते. ७८ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर होते. गैरहजर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियमानुसार सक्त कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. प्रशिक्षण वर्गास सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी निवडणूक नायब तहसीलदार डॉ.संदेश निकुंभ, सहाय्यक महसूल अधिकारी सुधीर बच्छाव, खडकी भाग मंडळ अधिकारी गणेश लोखंडे, निवडणूक महसूल सहाय्यक तुशांत अहिरे, तहसील कार्यालयातील सर्व महसूल सहाय्यक, सहायक महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here