मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आणि डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे जळगाव बाजारात सोनं-चांदीचे दर घसरणीकडे
साईमत / जळगाव
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठा उलटफेर नोंदवला गेला. मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल–इराण संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुढील दोन–तीन आठवड्यांत कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचबरोबर डॉलरमध्ये ०.५ टक्क्यांची मजबुती आल्यामुळे सोन्यासारख्या धातूंवर दबाव निर्माण झाला आहे.
जळगाव बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम जीएसटीसह १,५५,९४२ रुपये होते; गुरुवारी घट होऊन १,५३,७७९ रुपये झाले, तर शुक्रवारी सकाळी आणखी २५७५ रुपयांची घट होऊन १,५१,२०४ रुपयांपर्यंत घसरले. चांदीचे दर बुधवारी प्रति किलो २,५३,३८० रुपये, गुरुवारी २,४७,२०० रुपये आणि शुक्रवारी सकाळी २,४१,२०० रुपयांपर्यंत खाली आले.
विशेषत: होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजारातील अस्थिरता कायम आहे. गुंतवणूकदार सावधगिरी बाळगत आहेत, तर देशांतर्गत खरेदीदार आणि व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. लग्नसराईच्या हंगामात दरातील या अस्थिरतेमुळे खरेदीवर परिणाम होत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
