राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषणाचा ईशारा
साईमत / जळगाव / प्रतिनिधी
येथील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील रहदारीच्या जागेवर एक ठेकेदार अनधिकृत बांधकाम करीत असून ते त्वरित थांबवावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेश चिटणीस कैलास अप्पा सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या बाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील गट नं 2/2 ब चा समोरील पूर्व दिशेला रहदारीच्या रस्त्यावर या परिसरातील कोणीतरी ठेकेदार हा सदर जागा बळकावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक जागेवर अनधिकृत व बेकायदेशीर पणे बांधकाम करीत आहे. त्या जागेवर बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांना येण्या जाण्याचा वापर बंद होईल.
नागरिकांची गैरसोय होईल. तेथील घरे या बांधकामामुळे दाबली जातील. अशी तोंडी तक्रार तेथील रहिवाश्यांनी आमच्या संघटनेकडे केली आहे. तेथील रहिवाश्यांचा सदर बांधकामास विरोध असून सदर जागा मनपा ने ताब्यात घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग मनपा, पो. नि. रामानंद नगर पोलीस स्टेशन यांच्याकडे स्वतंत्रपणे निवेदन देण्यात येणार आहे. सदर बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा तेथील रहिवाश्यांच्या न्याय व हक्कासाठी आमच्या राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटने तर्फे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा प्रदेश चिटणीस कैलास अप्पा सोनावणे यांनी दिला आहे.