साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील खडकदेवळा येथील राज्य महामार्गावर सुरू असलेले अनधिकृत चारीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. चारीच्या कामामुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास आणि चारीमुळे अपघातास आमंत्रण देण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.
सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु.येथील तारखेडा ते पिंपळगाव राज्य महामार्ग क्र. १७ यावर १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीची संमती नसतांना आणि कोणताही ठराव नसतांना सदस्यांना न विचारता गावातील अनिल विश्राम पाटील यांनी जेसीबी मशीन लावून रस्त्याच्या उत्तर दिशेच्या रस्त्यावर पूर्व-पश्चिम राज्य महामार्ग क्र. ४८ पासून परत येवून सुरेश काशिनाथ सिनकर यांच्या घरापर्यंत चारी कोरून सार्वजनिक वापराचा रस्ता बंद केला. त्यामुळे नागरिकांना वापरण्यास तसेच रस्त्याने वाहन चालविण्यास अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे सार्वजनिक रहदारी व वापरास त्रास होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून पाणी साचुन आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अनिल पाटील यांनी विनाकारण कोणाचीही मागणी नसतांना ग्रामपंचायतीची परवानगी नसतानाही स्वतःच बेकायदेशिर कृत्य केले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतलेली नाही. तसेच ग्रामस्थांना त्रास होईल, असे कृत्य केले.
रस्त्यावर येण्या-जाण्यासाठीचा ग्रामस्थांचा रस्ता बंद
याकामी दुपारी ३ वाजता त्यास विचारणा केली. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, व ग्रा. पं. सर्व सदस्यांना बोलावून पाहणी केली. तेव्हा अनिल पाटील आणि त्यांचा मुलगा, त्यांचे भाऊ हे येवून शिवीगाळ करू लागले. दम देवू लागले. वास्तविक अनिल पाटील हे ग्रामपंचायतीत अपात्र झालेले सदस्य आहे. ते आज रोजी सरपंचही नाहीत, असे असतांना ग्रा. पं. च्या नावाने बेकायदेशिर कृती करून सार्वजनिक शांततेस अडथळा निर्माण करून शांतता भंग करीत आहे. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. त्यांच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होवून अपघात होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा रस्त्यावर येण्या जाण्यासाठीचा रस्ता बंद झालेला आहे.
संबंधितांना अर्जाच्या प्रति रवाना
निलेश खराटे यांनी अनिल पाटील यांच्याविरूध्द तक्रारी अर्ज दिला आहे. अनिल पाटील यांच्याविरूध्द, त्यांचा मुलगा आणि भाऊ यांच्याविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचा तक्रारी अर्ज निलेश अरुण खराटे (रा. खडकदेवळा, ता. पाचोरा) यांनी संबंधित प्रशासनास दिला आहे. तसेच अर्जाच्या प्रति जिल्हाधिकारी (जळगाव), सार्वजनिक बांधकाम उपविभाग (पाचोरा), तहसीलदार (पाचोरा), पोलीस निरीक्षक (पाचोरा), ग्रामसेवक (खडकदेवळा), कनिष्ठ सहाय्यक आरोग्य विभाग (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.