साईमत, पहूर, ता.जामनेर : वार्ताहर
पहूर पेठ येथील वाघूर नदीच्या तीरावर केवडेश्वर मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमी लगतचे अतिक्रमण काढण्यासाठी वाघूर विकास आघाडीतर्फे बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
पहूर पेठ येथे वाघूर नदीच्या तीरावर केवडेश्वर मंदिराजवळ हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीलगत अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणामुळे शोकाकुल बांधवांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसते. दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्यावर्षी वाघूर विकास आघाडीतर्फे स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी घंटानाद आंदोलन करून जागा मोजणीसाठी लोकवर्गणीतून शासकीय शुल्क भरले. प्रशासनाने अतिक्रमण काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, वर्ष उलटले तरी अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वाघूर विकास आघाडीच्यावतीने पहुर बस स्थानकावर ग्रामपंचायतसमोर सुकलाल बारी, भाऊराव गोंधनखेडे, सुधाकर शिनगारे, सुनील सोनार, ज्ञानेश्वर घोलप, दिलीप पांढरे, विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, भगवान कुमावत यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.