बीएलओंना लोकसभा निवडणूक भत्ता त्वरित द्या

0
57

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा टप्पा नुकताच पार पडला. त्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भर उन्हात घरोघर जाऊन मतदान स्लिप वाटपाचे काम त्यांनी केले. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांना मदत करत होते. प्रशासनाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या. त्याबद्दल इतर जिल्ह्यात आठशे रुपये निवडणूक भत्ता मतदानाच्या दिवशीच त्यांना देण्यात आला. परंतु जळगाव शहरातील बीएलओ यांना अद्याप एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे शहरातील सर्व बीएलओ नाराज आहे. त्यामुळे त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी स्वीकारले. बीएलओंना येत्या पंधरा दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास सर्व बीएलओ पदाचा राजीनामा देणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

वर्षभर बीएलओ प्रशासनाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाची विविध कामे करत असतात. त्यामध्ये नवीन मतदार नोंदणी, मयत मतदार, स्थलांतरित, दुबार नाव शोधणे, नावात दुरुस्ती करणे, सभेला उपस्थित राहणे, मतदार यादी प्रसिद्ध करणे आदी कामे असतात. ही कामे त्यांना रविवारी सुटीच्या दिवशी दिली जातात. ही कामे करतांना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.

निवेदनात इतर जिल्ह्यांप्रमाणे लोकसभा निवडणूक मानधन त्वरित मिळावे. कामाचे आदेश देतांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामार्फत देण्यात यावे. त्यात स्पष्टपणे कार्यमुक्तीचा उल्लेख असावा. वारंवार देण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या धमकी ऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या कामास प्रोत्साहन देण्यात यावे. सर्व शासकीय कर्मचारी असल्यामुळे तसेच रविवार हा एकच सुट्टीचा दिवस असल्यामुळे रविवार वगळून काम देण्यात यावे. बीएलओ यांना अनेक अधिकाऱ्यांमार्फत आदेश न देता केवळ एक अधिकारी सुनिश्‍चित करावा. मानवी दृष्टिकोन ठेवून सहानुभूतीची व प्रेमाची वागणूक मिळावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here