पदवीधर आमदारांकडे जुक्टो संघटनेतर्फे निवेदनाद्वारे मागणी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मासिक वेतनातून कपात झालेल्या एन.पी.एस. वर्गणीच्या रकमा तब्बल १ वर्ष उलटून गेले तरी अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेल्या नाहीत. याबाबत वेतन पथक कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही थातूरमातूर उत्तर देऊन बोळवण केली जात आहे. जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच पदवीधर आमदार सत्यजित तांबे रविवारी जळगाव महानगरात कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी महानगर कार्यकारिणीच्यावतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन या व इतर प्रलंबित न्याय्य समस्यांबाबत निवेदन देत वस्तुस्थिती कथन केली. निवेदन देतेवेळी महानगर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षा प्रा.अनिता ओहळ, कार्यकारिणी सदस्य प्रा.छाया चौधरी, प्रा.महेंद्र राठोड, अंशतः अनुदानित संघटनेचे महानगराध्यक्ष प्रा.योगेश धनगर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, जुक्टो संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.अतुल इंगळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या ऑगस्ट २०२४च्या वेतनातून एन.पी.एस.ची वर्गणी कपात झालेली आहे. मात्र, तब्बल १ वर्ष उलटून गेले तरी तसेच जानेवारी ते मार्च २०२५ची कपात झालेली रक्कम अद्यापही संबंधितांच्या खात्यात जमा झालेली नाही. पुढील महिन्यात जिल्ह्यातील बरेच एन.पी.एस.धारक सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना जमा न झालेल्या रकमेमुळे एन.पी.एस. पेन्शन प्रस्ताव तयार करण्यास अडचण येत आहे. त्यातच वित्त विभागाने कपातीच्या मिसिंग, क्रेडिट रकमेचा १० जुलै २०२५ रोजी जी.आर. काढलेला आहे. त्यामुळे रकमा जमा न झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच २०१८- १९ पासून जिल्ह्यातील घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे टप्पा वाढीचे पत्र त्वरित निर्गमित करण्यात यावे, पेन्शन विकल्पाविषयी व्यक्तिशः वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिकृत माहिती देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशा प्रमुख मागण्यांवा निवेदनात समावेश आहे.
सप्टेंबर अखेर कपातीच्या रकमा जमा
करण्याचा पथक अधीक्षकांकडून शब्द
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळिंकार यांनी भ्रमणध्वनीवरून आ.सत्यजित तांबे यांच्याशी चर्चा करून संबंधित समस्या त्वरित निकाली काढण्याचे साकडे घातले. आ.तांबे यांनी त्याची दखल घेत तात्काळ वेतन पथक अधीक्षक रियाज तडवी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर एन.पी.एस.कपातीच्या रकमा संबंधितांच्या खात्यात जमा करण्याबाबत आदेशित केले. यावेळी श्री.तडवी यांनी सप्टेंबर अखेर रकमा जमा होतील, असा शब्द आ.तांबे यांना दिला आहे.