मनसेने मनपाला लेखी निवेदन देऊन दिला आंदोलनाचा इशारा
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) परिसरात महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे केंद्र तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मागणीस अनुसरून मनसेने मनपाच्या आयुक्तांना लेखी निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्रामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. तसेच माशी, डास, उंदीर यांचा त्रास वाढल्याने विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परिसरात शासकीय तंत्रनिकेतनसारखी शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. कचऱ्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. त्यांचे शिक्षणाचे मूलभूत हक्कही धोक्यात आले असल्याची भूमिका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
हे केंद्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम १९४९ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या नियमांचे उल्लंघन करते. शिवाय, “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेला हे केंद्र विरोधात जाणारे असल्याचेही म्हटले आहे. अशा गलिच्छ कचरा केंद्रामुळे शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. नागरिकांच्या मनात नाराजी निर्माण होते, असे मतही निवेदनात व्यक्त केले आहे. मनपाकडे यापूर्वीही अनेक वेळा ह्या केंद्राबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, मनपाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. येत्या १ सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेचे काम नव्या एजन्सीकडे दिले जात आहे. त्यामुळे या एजन्सीलाही लेखी सूचना दिली जाईल आणि आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्यात यावे, अशीही मागणी केली आहे. अन्यथा कायदेशीर लढ्याची आणि तीव्र आंदोलनाची तयारी असल्याचा स्पष्ट इशाराही मनसेने निवेदनाद्वारे दिला आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगळे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, संदीप मांडोळे, ॲड. सागर शिंपी, संजय मोती, विकास पाथरे, भूषण ठाकूर यांच्यासह महिला सेनेच्या पदाधिकारी अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, लताबाई पाथरवट, नजमा तडवी आदी उपस्थित होते.