साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
येथील बुऱ्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीत तात्काळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी, यासाठी मुक्ताईनगर शिवसेनेच्यावतीने मुक्ताईनगर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांना निवेदन देण्यात आले.
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील बुऱ्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमी बांधकामासाठी आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून नगर विकास विभागातून निधीची तरतूद होऊन काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अद्यापही नगरपंचायत विभागाकडून याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली नसल्याने त्याठिकाणी साहित्य चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. तेथे बसविण्यात आलेले मार्बल भामट्या चोरांकडून चोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून त्याठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, असे निवेदन शिवसैनिकांनी दिले आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामी तात्काळ दाखले द्या
शैक्षणिक सत्र २०२४-२५ करीता विद्यार्थ्यांना लागणारे सर्व प्रकारचे दाखले तात्काळ देण्यात यावे, यासाठी मुक्ताईनगर शिवसेनेच्यावतीने मुक्ताईनगर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत दहावी आणि बारावी व इतर शैक्षणिक सत्रांचे परीक्षेचे निकाल लागलेले आहे. पुढील शैक्षणिक सत्रांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमीलेअर, अधिवास दाखले, राष्ट्रीयत्व दाखले व इतर महत्त्वाचे दाखले आजही लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. चालू शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थ्यांना लागणारे दाखले तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शहर प्रमुख गणेश टोंगे, जाफर अली, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र तळेले, वसंत भलभले, संतोष माळी, गणेश पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.