Mr. Kishore Patil ; आ.किशोर पाटील यांच्याहस्ते नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तत्काळ मदत

0
17

भोकरीतील पुरात मृत व्यक्तीच्या कुटुंबाला मिळाले शासनाकडून ४ लाख रुपये

साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :

नैसर्गिक आपत्तीमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांच्या वारसांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते, पुराच्या पाण्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाकडून मंजूर झालेली चार लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

माहे सप्टेंबरमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यात भोकरी (ता. पाचोरा) येथील सतीष मोहन चौधरी (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. शासनाच्या आपत्ती मदत निधीमधून त्यांच्या वारस चंदाबाई सतीष चौधरी यांना चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. शासन निर्णय दि. २७ मार्च २०२३ नुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत ही मदत देण्यात आली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोषागारातून ती रक्कम वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

ही मदत वितरण प्रक्रिया पाचोरा तहसील कार्यालयात पार पडली. आ.किशोर पाटील यांच्या हस्ते वारसांना मदतीचे धनादेश (पत्रक) सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी आ. पाटील यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाला शासनाचा आधार वेळेवर पोहोचला पाहिजे. हे आमचे कर्तव्य असून अशा प्रत्येक घटनेत मदत तातडीने देण्यासाठी प्रशासन आणि जनप्रतिनिधी एकत्र कार्य करतील.

कार्यक्रमावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील तसेच महसूल विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते झालेली ही मदत वितरण प्रक्रिया नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासन व लोकप्रतिनिधींकडून तात्काळ आधार मिळवून देण्याची संवेदनशील वृत्ती दर्शवते. या मदतीमुळे चौधरी कुटुंबाला दिलासा मिळाला असून स्थानिक नागरिकांमध्ये आ.पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here