पार्किंग बंदी असूनही प्रवासी वाहने उभी राहतात
साईमत/भुसावळ / प्रतिनिधी,
भुसावळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतुकीचा मोठा सुळसुळाट सुरु आहे, आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून खासगी वाहनांद्वारे बिनधास्त प्रवासी वाहतूक केली जात असून, एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासन आणि वाहतूक शाखा यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही, त्यामुळे नियम तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.
बसस्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक सुरु असून, क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी भरून मुक्ताईनगर, बोदवड, यावल, फैजपूर, सावदा, जामनेर आणि जळगाव या मार्गांवर प्रवासी वाहून नेले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या नियमबाह्य वाहतुकीमुळे अधिकृत एसटी सेवेला देखील मोठा फटका बसतो आहे.
रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये खुलेआम प्रवासी भरले जात आहेत. स्थानकाच्या समोरील परिसरात पार्किंगला स्पष्ट बंदी असतानाही वाहने उभी राहतात आणि चढ-उतार सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. परिणामी प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
टचिंग पॉइंटची तातडीची गरज
बसस्थानकाचे स्थलांतर तात्काळ शक्य नसल्याने लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी बसेससाठी नाहाटा चौफुली येथे स्वतंत्र ‘टचिंग पॉइंट’ सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे नागरिक आणि प्रवासी यांच्याकडून मागणी केली जात आहे. या ठिकाणी आधीच काँक्रिटीकरण झाले असल्यामुळे हा निर्णय तात्काळ अंमलात आणता येऊ शकतो. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर सेवा मिळू शकेल.
दरम्यान, नागरिकांनी तातडीने अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, अन्यथा एखाद्या दुर्घटनेनंतरच जाग येईल का, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे.
