हरताळे तलावातून अवैध गौण खनिज उत्खनन बंद

0
8

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील हरताळे येथील ब्रिटीशकालीन पाझर तलावातून शेकडो टिप्पर, जेसीबीच्या सह्याने विनापरवाना अवैध गौण खनिज वाहतूक मागील काही दिवसांपासून रात्रंदिवस सुरू होती. परंतु तालुका प्रशासनाकडून तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्यामुळे तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याने अवैध गौण खनिज उत्खनन बंद झालेले आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या अवैध उत्खननावर कारवाईची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांसाठी व अभिजात कुंभारांसाठी उत्खनन कामे कोणतेही चलन भरण्याची आवश्‍यकता नसते. तलावातून एका कन्स्ट्रक्शन कंपनीने गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह, सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कन्स्ट्रक्शन कंपनीला ४ कोटी ५४ लाखाचा दंड झालेला होता. परंतु मागील काही दिवसात उत्खनन करणाऱ्यांकडून राजकीय बगलबच्चे व प्रभारी महसूल प्रशासनाशी आर्थिक हितसंबंध साधून रात्रंदिवस हजारो ब्रास उत्खनन केले आहे. परंतु उत्खनन सुरू असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून उत्खनन कामी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तसेच उत्खननकामी जिल्हा तसेच तालुका प्रशासनाकडे कोणतेही उत्खनन कामे महसूल जमा करण्यात आलेला नाही. कोणत्याही तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या नसल्याचे समजते.

उत्खनन करणारी कंपनी किती प्रमाणात गौण खनिज उत्खनन करणार, कधीपर्यंत उत्खनन करणार, किती व कोणत्या वाहनांनी उत्खनन करणार यासह उत्खनन करताना तलावात किती फूट खोल खोदणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण होत आहे. परंतु शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून स्वतःच्या आर्थिक हितसंबंधापोटी संपूर्ण महसूल यंत्रणा हरताळे येथील अवैध गौण खनिज वाहतुकीला संरक्षण व समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हरताळे येथील ब्रिटीशकालीन पाझर तलावातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अवैध उत्खनन जरी बंद झालेले असले तरी झालेल्या हजारो ब्रास अवैध उत्खननावर प्रभारी महसूल प्रशासन कधी व कोणती कारवाई करणार? महसूल अधिनियमाच्या अनुषंगाने महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होणार की अधिकाऱ्यांच्या खिशात? याबाबत तालुक्यात विविध चर्चांना ऊत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here