दारूबंदी विभागाची कारवाई, ६८ हजाराचे कच्चे रसायन नष्ट
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
भुसावळ तालुक्यातील दारूबंदी विभागाच्या ओझरखेडा गावात मंगळवारी दुपारी ४ वाजता सुमारास अवैध हातभट्टी दारू ठिकाणावर अचानक धाड टाकुन ६८ हजाराचे कच्चे रसायन आणि तयार केलेली दारू नष्ट केली आहे.
भुसावळ तालुका दारूबंदी अधिकारी सुजित कपाटे यांना ओझरखेडा गावालगतच्या साठवण तलावाजवळील पाटसरीत एका मंदिराजवळ अवैध गावठी दारूची हातभट्टी गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी मंगळवारी अजय गावंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, ईश्वर बाविस्कर व अन्य कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन ओझरखेडा गावालगतच्या तलावाजवळ मिळालेल्या माहितीप्रमाणे पाटचारीत शोध घेतला असता पथकाला अवैध दारूची हातभट्टी आढळून आली. मात्र, दारूभट्टीचा मालक आणि मजुर यांना अधिकारी व कर्मचारी आल्याचा सुगावा लागताच पसार झाले.
मात्र, पथकातील दारूबंदी अधिकारी सुजित कपाटे व कर्मचाऱ्यांनी अवैध दारूच्या हातभट्टीवरील ६८ हजार रूपये किंमतीचे २०० लिटरचे ८ बॅरल कच्चे रसायन व तयार केलेली दारू नष्ट करून विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त नाशिक श्रीमती वर्मा, अधीक्षक जळगाव विठ्ठल भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.यावेळी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दारूबंदी विभागाकडून कारवाईचे सातत्य ठेवले जाणार आहे, अशी माहिती दारूबंदी तालुका अधिकारी सुजित कपाटे यांनी दिली.
हातभट्टी मालक ओझरखेड्यातीलच ?
ओझरखेडा साठवण तलाव नजिक असलेल्या पिरबाबाच्या दर्गाजवळील गावठी हातभट्टी निर्मितीचा धंदा गेल्या काही वर्षापासून सुरू होता . याबाबत परिसरातील पोलिसांनाही याची माहिती मिळाली होती. मात्र, कारवाई होत नसल्याने ओझरखेडा गावातीलच या गावठी हातभट्टी मद्य सम्राटाची मुजोरी दिवसेंदिवस वाढली आहे. मागील काही महिन्यापुर्वीच साठवण तलावानजिक अवैधरित्या सुरू असलेला नामाकिंत कंपनीच्या बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. मात्र, कारवाईत भाडेतत्वाने दिलेल्या शेत मालका व्यतिरिक्त कारखानदारांपैकी कुणालाही अटक केली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यानंतरही या भागात गावठी हातभट्टी निर्मितीचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याने दारुबंदी विभाग व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.