पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :
तालुक्यातील बहादरपूर शिवारात अवैध बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत सुमारे ४० लाख ३३ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बहादरपूर येथील बोरी नदीच्या किनारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध बनावट ‘टॅंगो पंच’ देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळाली होती.
त्यानुसार कारखान्यात पारोळा पोलिसांनी छापा टाकला असता राकेश छगनलाल जैन, टिन्या डोंगऱ्या पावरा, कतारसिंग गण्यासिंग पावरा या तिघांना अटक करून पोलिसांनी बनावट कारखान्यातून ३१०० नग दारूच्या बाटल्या, ८०० लीटर कच्चा माल, दोन लाख रुपये किंमतीच्या दोन चारचाकी तसेच बाटली पॅकिंग आणि सीलिंगसाठी लागणारी हाय-टेक मशिनरी, हजारो रिकाम्या बाटल्या,बूच साहित्य असे सुमारे ४० लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.