ॲड.अर्जुन पाटील यांचा इशारा; बेघर वृद्ध दाम्पत्याला मिळवून दिली ८१ आर. जमीन
साईमत /बोदवड/प्रतिनिधी :
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक असून त्यांचा छळ करून सेवा-सुश्रूषेचे आमिष दाखवून मालमत्ता हडपणाऱ्या मुलांनी सावध राहावे. आई-वडिलांना योग्य वागणूक दिली नाही तर दिलेली संपत्ती कायद्यानुसार परत घेतली जाऊ शकते, असा ठाम इशारा ॲड. अर्जुन पाटील यांनी दिला आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा पालकांच्या बाजूने असून त्यांनी अन्याय सहन करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदिर परिसरात वास्तव्यास असलेल्या गोळेगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) येथील कस्तुराबाई शांताराम पाटील (वय ७६) व शांताराम नामदेव पाटील (वय ७७) या वृद्ध दाम्पत्याची व्यथा जाणून घेतल्यानंतर ॲड.अर्जुन पाटील यांनी त्यांच्यासाठी विनामूल्य न्यायालयीन लढा उभारला. या लढ्याच्या माध्यमातून मुलाच्या नावे केलेली व नंतर परस्पर विकलेली ०.८१ हेक्टर म्हणजेच ८१ आर.जमीन पुन्हा आई-वडिलांच्या नावे करून देण्यात आली.
जमीन वृद्ध दाम्पत्याची स्वकष्टार्जित मिळकत होती. मुलगा नामदेव पाटील (रा.सुरत) याने आयुष्यभर सेवा-सुश्रूषा करीन, असे आश्वासन देत १० फेब्रुवारी २०२२ रोजी ही जमीन स्वतःच्या नावे करून घेतली. मात्र, जमीन नावावर होताच त्याने पालकांचा छळ सुरू केला. पुढे पालकांना विश्वासात न घेता २० एप्रिल २०२३ रोजी ही जमीन मंगलाबाई कृष्णा चौके यांना विकून तो सुरतला निघून गेला. यामुळे या वृद्ध दाम्पत्यावर मंदिरात राहण्याची व अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली.
याप्रकरणी उपविभागीय अधिकारी (प्रांत) जितेंद्र पाटील यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. न्यायालयाने मुलाच्या नावे झालेले खरेदीखत व त्यानंतरचे सर्व व्यवहार बेकायदेशीर ठरवून रद्द केले. संबंधित जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर कस्तुराबाई शांताराम पाटील यांचे नाव पुन्हा भोगवटादार म्हणून नोंदवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक (बोदवड) यांनी जमीन ताब्यात घेऊन ती तात्काळ वृद्ध पालकांच्या स्वाधीन करावी, असे स्पष्ट निर्देश दिले.याशिवाय न्यायालयाने मुलाला आपल्या वृद्ध पालकांना दरमहा ३ हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले. १ जानेवारी २०२६ रोजी नवीन वर्षाच्या दिवशी आजींचे नाव अधिकृतपणे सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यात आले. हे कळताच आजी-आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
वयोवृद्ध पालकांकडे दुर्लक्ष करून त्यांची मालमत्ता बळकावणाऱ्यांसाठी हा निकाल एक ठोस इशारा ठरला असून, समाजात मोठा संदेश देणारा आहे. या न्यायालयीन प्रक्रियेत ॲड. अर्जुन पाटील यांना ॲड.किशोर महाजन व ॲड.धनराज प्रजापती यांनी सहकार्य केले.
