बदल स्वीकारून मेहनत, कष्ट केल्यास व्यवसाय-उद्योगात निश्चित यश – नितीन बंग

0
16

साईमत जळगाव प्रतिनिधी

तरूणांनी आपल्यातील क्षमता ओळखुन व्यवसाय करण्यासाठी पावले टाकावीत. मात्र व्यवसायात होणारे बदल स्वीकारून मेहनत आणि कष्ट करण्याची जोड दिली तर व्यवसाय-उद्योगात निश्चित यश प्राप्त होईल असे मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (CAIT) अध्यक्ष व उद्योजक नितीन बंग यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्यावतीने मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी विद्यापीठ – उद्योग संवाद शिखर परिषदेचे उद्घाटन प्रसंगी श्री. बंग बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विन्ले पॉलीमर्सचे मुख्य कार्यकारी प्रमोद संचेती, सोयो सिस्टीमचे मुख्य कार्यकारी किशोर ढाके उपस्थित होते तर अतिथी म्हणून रवीकिरण कोंबडे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची उपस्थिती होती.
श्री. बंग पुढे म्हणाले की, भविष्यात नोक-यांची संधी कमी होत चालली आहे अशा वेळी आपल्यातील क्षमता ओळखुन संधीचा शोध घ्यायला हवा, चरितार्थाची साधने आपण शोधायलाच हवीत. प्राप्त झालेल्या टक्केवारीपेक्षा क्षमता आणि अनुभव यांना अधिक महत्व आहे. क्षमतेनुसार व्यवसाय करा. यश-अपयशाची पर्वा करू नका. व्यवसायात लवचिकता ठेवा. नवीन बदल स्वीकारा आणि मित्रांच्या संपर्कात सतत राहा. कारण त्यातुन व्यापार वाढीला मदत होते. सकारात्मक विचार आणि मेहनत व कष्ट करण्याची तयारी यातूनच यशस्वी व्हाल असा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी हे विद्यापीठ तिन्हीही जिल्ह्यातील प्रत्येक समाज घटकांचे विद्यापीठ असुन सर्व घटकांशी संवाद वाढविण्याचा विद्यापीठाकडून प्रयत्न कला जात आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात इंटर्नशिपला महत्व असल्यामुळे उद्योजकांच्या पाठिंब्याची विद्यापीठाला गरज आहे. विद्यापीठात उत्तम प्रयोगशाळा आहेत, संशोधन आहे आणि विश्लेषण करण्याची क्षमता आहे. त्यांचा फायदा या भागातील उद्योजकांनी करावा असे आवाहन प्रा. माहेश्वरी यांनी केले.
प्रारंभी सीटीपीसीचे समन्वयक प्रा. रमेश सरदार यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भुमिका सांगितली. प्रा. जी. ए. उस्मानी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यश सोनवणे, सोनाली दायमा व प्रा. सरदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपसमन्वयक प्रा. उज्ज्वल पाटील यांनी आभार मानले.
उद्घाटनानंतरच्या झालेल्या चर्चेत संतोष शिवाने (पुणे), संदीप जोशी (संभाजीनगर), गौसुद्दीन खान (हैद्राबाद), मोहम्मद फारूख खान (संभाजीनगर) तसेच उमेश सेठीया, सुरज धाजल, भाऊसाहेब चिमाटे, संजय पानीकर, डॉ. देवदत्त गोखले, संजय पवार, अरूण महाजन, हिमांशु उके, विरेंद्र छाजेड, प्रवीण सिंग, संजय शहा, संतोष बिरारी, रश्मी गोखले, रोहन मंत्री, भास्कर माळी, अनिल पवार, डॉ. जितेंद्र नारखेडे, डॉ. विशाल पराते, पवन मेश्राम यांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here