लाडशाखीय वाणी समाजाच्या महामेळाव्यात नेत्यांची भूमिका जाहीर
साईमत।चाळीसगाव।प्रतिनिधी।
येथील मालेगाव रस्त्यालगतच्या विशाल वंदन नगर येथे रविवारी, २२ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचा महामेळावा घेण्यात आला. मेळाव्यात व्यासपीठावरील उपस्थित नेते मंडळीपैकी विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. त्यात गोविंद शिरोळे यांनी “पारोळा” व मयूर अलई यांनी “नाशिक पश्चिम” विधानसभा मतदार संघातून राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्यास “अपक्ष” म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. शिरोळे यांनी गेल्यावेळी पारोळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती, असे त्यांनी सांगितले.
रेखाताई कोतकर (नाशिक) यांनी मुलीचा विवाह झाल्यावर मुलीच्या आईने मुलीची मैत्रीण न बनता मुलीला सासूची मैत्रीण बनू द्या, असा सल्ला देऊन मुलीच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केले.भावेश कोठावदे (चाळीसगाव) यांनी समाजातील ज्यांना राजकारणात उतरायचे आहे. त्यांनी आपल्या प्रभागापासून सुरुवात करून सर्व समाजातील जनतेच्या मनात वाणी समाजाबद्दल आपुलकीची भावना जेव्हा निर्माण होईल, तेव्हा आपल्या समाजाचे लोकप्रतिनिधी विधानसभा, विधान परिषदेमध्ये दिसतील. त्यासाठी नवीन युवा पिढीने आले पाहिजे आणि त्याला समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांनी साथ दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
गजानन मालपूरे (जळगाव) यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेऊन समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मेळाव्याचे आयोजक सतीश पाटे (चाळीसगाव) यांनी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १७ ते १८ मतदारसंघांमध्ये समाजाचे मतदान निर्णायक आहे. त्यामुळे समाजाने स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती बघून योग्य तो निर्णय घ्यावा. किरण पिंगळे (डोंबिवली) यांनी पदवीधर मतदारसंघातून समाजाचा उमेदवार निवडून जाऊ शकतो. त्यासाठी समाजातील पदवीधरांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले.
शिरपुरच्या देशमुख ग्रुपतर्फे कानबाईच्या गाण्याचा कार्यक्रम
जयवंत वाणी (मुंबई )यांनी समाजाजवळ उपयुक्तता आहे. त्यामुळे आपले उपद्रव मूल्य दाखविण्याची वेळ आली आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष येथील समाजाचे अध्यक्ष शरद अण्णा मोराणकर आणि सचिव सी. सी. वाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यासपीठावरील उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रम सुरु होण्याअगोदर शिरपूर येथील देशमुख ग्रुपचा कानबाईच्या गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून समाजाचे मान्यवर नेतेमंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.