स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी सुरक्षारक्षकांची आर्थिक, शारीरिक पिळवणूक होत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारीनंतरही सुरक्षा रक्षकांना न्याय न मिळाल्याने संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील ॲड.अमोल साळोक त्यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आलेली आहे. कंत्राटी सुरक्षा रक्षकांना आर्थिक न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे कंत्राटी स्वरूपावर चार-चार अशा तीन शिफ्टमध्ये बारा सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळत नसून आजतागायत सुरक्षा रक्षकांना वेतन चिठ्ठी देण्यात आलेली नाही. तसेच संबंधित सुरक्षा रक्षकांना वेतनानुसार पीएफ, ईएसआय देण्यात येत नाही. शासन सुरक्षा रक्षकाच्या अनुषंगाने शासनाचा व्यवसाय कर व जीएसटी बुडवला जात आहे. करारानुसार सुरक्षारक्षकांना आठ तास ड्युटी करणे बंधनकारक असताना कंत्राटदार सुरक्षा रक्षकांना बारा-बारा तास ड्युटी करून घेत आहे. संबंधित माहिती ही माहिती अधिकार अर्जात उघड झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागील एक वर्षापासून सातत्याने वारंवार तक्रारी करू नये.
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पाठवली कायदेशीर नोटीस
सुरक्षारक्षकांची आर्थिक लूट थांबत नसल्याने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची ठेकेदारासोबत आर्थिक भागीदारी सिद्ध होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारावर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून डोळेझाकपणे आर्थिक पांघरून घातले जात आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयातील ॲड. अमोल साळोक यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तरीही सुरक्षारक्षकांना आर्थिक न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.