साईमत, प्रतिनिधी, जळगाव
जिल्हा पोलीस दलातील क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्यां स्पर्धकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी नियमित सराव करणे गरजेचे आहे. सरावात सातत्य असेल तर यश मिळणे अवघड नाही. त्यासाठी नियमित किमान अर्धा तास तरी सराव करणे गरजेचे, असा सल्ला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोलीस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धत यश मिळवणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस वितरण प्रसंगी दिला.
जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मुख्यालयातर्फे गेल्या तीन दिवसांपासून विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंना पारितोषीक वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकीत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, यश मिळवलेल्या खेळाडूंना आपली सांघिक तसेच वैयक्तीक कामगिरी उंचावण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असल्यास मिळवून देईन, यासाठी जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक तसेच क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रशिक्षक मिळवण्यासाठी प्रयत्न करेल, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. तसेच ज्या पोलीस स्टेशनमध्ये नियमित योगा क्लास सुरू आहेत. त्या क्लासला सर्वांनी किमान अर्धा तास तरी हजेरी नियमित द्यावी, असे आवाहनही त्यांनी फिटनेससाठी पोलीस दलास केले.
यावेळी सुरुवातीला पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून बक्षीस वितरण समारंभास उपस्थित जिल्हाधिकारी, जि.प सीईओ यांचे उपस्थिती दिल्याबद्दल आभार मानल. अशीच कामगिरी करीत जिल्हा पोलीस दलाचे नाव उंचावत रहा, असे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले.
या खेळाडूंचा झाला गौरव
महिला 100 मीटर धावणे – प्रथम क्रमांक प्रियंका टिकारे, द्वितीय क्रमांक मंजुषा सावळा.
पुरुष 100 मीटर धावणे -प्रथम क्रमांक राहुल बोराडे, द्वितीय इक्बाल सादिक. महिला बेस्ट ॲथेलीस्ट म्हणून प्रियंका टिकारे. पुरुष बेस्ट ॲथेलीस्ट म्हणून राहुल बोराडे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले.
कबड्डी पुरुष संघ- प्रथम पोलीस मुख्यालय, द्वितीय फैजपुर-मुक्ताईनगर विभाग. हॉकी- प्रथम पोलीस मुख्यालय, द्वितीय जळगाव – भुसावळ विभाग. फुटबॉल – प्रथम पोलीस मुख्यालय, द्वितीय जळगाव – भुसावळ विभाग. व्हॉलीबॉल महिला संघ – प्रथम पोलीस मुख्यालय, द्वितीय फैजपुर-मुक्ताईनगर विभाग. व्हॉलीबॉल पुरुष संघ – प्रथम चोपडा- अमळनेर विभाग, द्वितीय पोलीस मुख्यालय. कबड्डी -महिला संघ प्रथम पोलीस मुख्यालय, द्वितीय चाळीसगाव- पाचोरा विभाग आदी संघांना पारितोषीक देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलीस विभाग विरुद्ध महसूल विभागाचा क्रिकेटचा सामना रंगला
जिल्हा पोलीस विभाग विरुद्ध जिल्हा महसूल विभाग क्रिकेट मच रोमांचकारी झाली. यात महसूल विभागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी टीममध्ये सहभाग घेतला होता. यावेळी पोलीस दलाने हा सामना जिंकला.