साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
राज्यभरात सर्वत्र दही हंडीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. दही हंडीचा उत्सवाला राजकीय रंग देण्याची गरज नाही. वरळीतील जांबोरी मैदानावरूनही शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. यावरही आदित्य यांनी भाष्य केले. दही हंडीसाठी जांबोरी मैदान मिळावं यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न केले नाही. आज आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी तो उत्साहत साजरा करावा असेही ठाकरे म्हणाले.
दोन वर्षापूर्वीच अडीच कोटी रुपये खर्चून आम्ही जांबोरी मैदान चांगले केले आहे. माझी सर्वांना एवढीच विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नका. हा बालिशपणा असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. राज्यावर गेली दोन वर्षे कोरोनाचे संकट होते.
त्यामुळे आपल्याला हा उत्सव साजरा करता आला नव्हता. पण यावर्षी मात्र, जल्लोषात दही हंडीचा उत्सव साजरा केला जात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. मी अनेक ठिकाणी जात आहे. प्रतिसाद चांगला मिळत असल्याचेही आदित्य म्हणाले.
भाजपने वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्याने त्यांच्याकडून शिवसेनेला शह देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा आहे. वरळीत शिवसेनेचे तीन आमदार आणि एक खासदार असूनही शिवसेनेला वरळीचं जांबोरी मैदान मिळवता आले नाही. भाजपच्या या खेळीने आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.