Husband Sentenced To 8 Years : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला ८ वर्ष कारावासाची शिक्षा

0
9

शहादा न्यायालयाने १० हजार रुपयाचा दंडही ठोठावला

साईमत/नंदुरबार/प्रतिनिधी :

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला न्यायालयाने ८ वर्षाचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राजू बाबूलाल सरपे असे आरोपीचे नाव आहे. शहादाच्या बुडीगव्हाण येथील राजू सरपे हा पत्नी बानूबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून तो तिला नेहमीच मारहाण करीत होता. गेल्या २९ मे २०२० रोजी बानूबाई, राजू आणि त्यांचा मुलगा गोपाल असे जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. तेव्हा तिथेही राजू याने बानूबाई हिला जबर मारहाण केली. तसेच साडीने गळा आवळला. या घटनेमुळे घाबरलेला मुलगा गोपाल हा धावत गावात आला. त्यानंतर त्याने आईला वडील मारत असल्याचे सांगितले. त्यानंतर गावातल्या लोकांनी बानूबाईचा भाऊ तथा फिर्यादी किशोर सोनवणे यालाही माहिती दिली.

घटनास्थळाकडे किशोर व इतर ग्रामस्थ धावले. तेथे बानूबाई ही जमिनीवर निपचित पडलेली आढळली. तिच्या गळ्याभोवती साडीचा पदर घट्ट आवळलेला आढळला. ग्रामस्थ आल्याचे पाहताच राजूने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला ग्रामस्थांनी पकडले. बानूबाईला म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी किशोर सोनवणे याच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात राजू सरपे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

शहादा सत्र न्यायालयात चालला खटला

तत्कालीन सहायक फौजदार दिनेश भदाणे यांनी सखोल तपास करून पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. राजूला अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. याप्रकरणी शहादा येथील सत्र न्यायालयात खटला चालला. त्यात साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या. एस.सी. पठारे यांनी राजू सरपे यास ८ वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. आर.पी. गावित यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सागर नांद्रे, हवालदार परशराम कोकणी, गणेश सावळे, देविदास सूर्यवंशी, शैलेंद्र जाधव यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here