वहनोत्सवासह रथोत्सवास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ
साईमत/चोपडा/प्रतिनिधी :
येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थांनाचा सुमारे चारशेपेक्षा जास्त वर्षांची विशाल परंपरा असलेला वहनोत्सव व रथोत्सव येत्या ३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान शहरात साजरा होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष प्रवीण गुजराथी व विश्वस्तांनी यांनी दिली. चोपड्याच्या सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ब्रम्होत्सव महोत्सवाला ३ पासून वहनोत्सव सुरु होवून दररोज वेगवेगळ्या वहनावर आरुढ होवून श्री बालाजी महाराजांची शहरातील विविध भागात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येईल. त्यानिमित्ताने उत्सवाची मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.
दररोज एक याप्रमाणे या वर्षाचे निघणारे दहा दिवसांचे वहन व त्याचा मार्ग असा राहील. ३ ऑक्टोबर रोजी – हत्ती (गांधी चौक, बाजारपेठ ), ४ –गरुड (मोठा देव्हारा, गणेश कॅालनी), ५- मारुती (अरुणनगर, श्रीराम नगर), ६ – सुर्य (गुजर अळी), ७- नागोबा (सुंदरगढी), ८- सिंह (जबरेराम मंदिर, भाटगल्ली), ९ – मोर (बडगुजर गल्ली), १० – चंद्र (पाटील गढी, मल्हारपुरा), ११- वाघ (गुजराथी गल्ली), १२ – घोडा (चौधरी वाडा, बाजारपेठ) तर १३ ऑक्टोबरला बत्तीस पुतळी (गांधी चौक, बाजारपेठ) वहनोत्सव दररोज धार्मिक विधीनंतर रात्री नऊ वाजेनंतर मंदिरापासून निघेल.
व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव
यंदाचा चोपड्याचा रथोत्सव १४ व १५ ऑक्टोबरला श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचा खान्देशात प्रसिद्ध असलेला रथोत्सव १४ व १५ ला होणार आहे. १४ ला सकाळी १० वाजता गोलमंदिराजवळील श्री बालाजी मंदिरापासून श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल. आशा टॅाकीज, ग्रामदैवत श्री आनंदी भवानी मंदिर, रथ मार्गाने रथ आठवडे बाजार, पाटील दरवाजा मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक्कामी येईल. त्याठिकाणी रात्रभर भाविकांच्या दर्शनासाठी रथ मुक्कामी राहील. त्यांनतर १५ रोजी सकाळी १० वाजता रथाच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल.
शहरात दोन दिवसाची रथयात्रा
शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गाने पुन्हा गोलमंदिराजवळ येवून यंदाच्या वहनोत्सव रथोत्सवाचा समारोप होईल. यानिमित्त रथोत्सव काळात शहरात दोन दिवसाची रथयात्रा भरते. शहराच्या श्रध्देचा भाग असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.