‘शावैम’ अधिष्ठातांसह कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे समाजातून कौतुक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील नवीन बी. जे. मार्केट परिसरात बुधवारी, २२ रोजी एक महिला व एक पुरुष बेवारस अवस्थेत पडलेले आढळले. ही माहिती मिळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे कर्मचारी तत्काळ धावून गेले आणि दोघांना उपचारासाठी दाखल करून दोघांचे प्राण वाचवले.
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करून माहिती दिली की, मार्केटमध्ये ही दोन्ही आजारी आहेत. दिवाळी सणाच्या व्यस्त वातावरणातही, मार्केटमध्ये कोणी उपस्थित नसतानाही डॉ. ठाकूर यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी स्मार्ट सर्व्हिसेसचे सुपरवायझर राहुल सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना दिली. राहुल सोनवणे यांनी योगेश कासार, निलेश पाटील, भूषण सोनवणे, नकुल तायडे, मुकेश शिंदे, करण तायडे यांच्यासह दोघांनाही स्ट्रेचरवर ठेवून शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचारानंतर दोघांना बेवारस रुग्णांच्या कक्षात दाखल केले. तसेच त्यांना मोफत भोजनाची व्यवस्था केली.
या कार्यतत्परतेबद्दल अधिष्ठाता डॉ. ठाकूर, उप-अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ. रमेश वासनिक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह जी.पी.एस. मित्र परिवार, पाळधी, जी. एम. फाउंडेशन, गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्ष, विचार वारसा फाउंडेशन यांनी अभिनंदन केले. या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, संकटाच्या वेळेस माणुसकी अद्भुतपणे जिवंत असते आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मानवतेचा सन्मान कायम राहतो.



