महिला अपराध नियंत्रण शाखेच्यावतीने ‘मानव अधिकार दिवस’ उत्साहात
साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी :
येथे प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आणि महिला अपराध नियंत्रण शाखेच्या वतीने ‘मानव अधिकार दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक मानव अधिकार दिनानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
कार्यक्रमात संघटनेचे कार्याध्यक्ष बी.डी.गवई यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत. जे श्रीमंत असो की गरीब, सर्वांना समान आहेत. मतदानाचा अधिकार, धर्मनिरपेक्ष सन्मान, शिक्षणाचा अधिकार हे सर्व संविधानामुळे सुनिश्चित आहेत. म्हणूनच मानव अधिकार दिनाचे औचित्य अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे.
माजी विस्तार अधिकारी राजकुमार जैन यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, बाल अत्याचार, महिलांवरील अत्याचार आणि वृध्दांवरील अन्याय याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या अत्याचारांवर कायद्याच्या चौकटीत राहून संघटना न्याय देण्याचे काम करते. तसेच प्रत्येक गोरगरीब महिला व लहान बालकांना न्याय मिळावा यासाठी समाजात प्रबोधन करण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले. कार्यक्रमात संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मेढे यांनी मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावा दिला. नवीन सदस्यांना संघटनेच्या ओळखपत्रांचे वितरण केले. ज्यात प्रा.छाया ठिंगळे, राजकुमार जैन, इंद्रायणी भोई यांचा समावेश होता.
कार्यक्रमास तालुकाध्यक्ष भास्कर मिस्त्री, उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर, तालुका कार्याध्यक्ष बी.डी.गवई, संघटक समाधान पाटील, रामदास सुतार, शहर संघटक धनंजय सापधरे, जगदेव इंगळे, तालुका महिला संघटक भारती लोखंडे, तालुका सदस्य चंद्रकांत रावये उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुका सचिव हकीम चौधरी यांनी केले तर आभार विजय खराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कांचन गवई यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी मानवाधिकार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत, समाजात न्यायप्रबोधनासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
