‘Shiv Sena’ Establish Party : स्थानिक प्रभावशाली सेनापतीशिवाय ‘शिवसेना’ पक्षीय वर्चस्व कसे निर्माण करु शकेल…?

0
29

स्थानिक निवडणुका… वेध राजकीय स्थितीचा…!

साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : 

शिवसेनेत फुट पडल्यानंतर पक्षाची दोन शक्कले झाल्याने या पक्षाची संघटनात्मक शक्ती बऱ्यापैकी विभागली गेली. सत्तेसाठी म्हणा की, अन्य कुठल्या कारणाने म्हणा शिवसेनेच्या ज्या आमदारांनी तत्कालीन मंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्याच नावाने वेगळा गट स्थापन केला आणि आज तो गट सत्तेची फळे चाखत आहेत तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना उबाठा आता जळगाव जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यात जिल्हा स्तरावर प्रभाव पाडू शकेल, असा एकही नेता नाही. तथापि, सर्वसाधारण कार्यकर्त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे प्रणित शिवसेना आपला प्रभाव किती आणि कसा उमटवू शकेल, हे सांगणे अवघड आहे.

राजकीय क्षेत्रात गेले कित्येक वर्ष मैत्रिपूर्ण संबंध जोपासणारे आता एकमेकांचे कट्टर विरोधी झाले आहेत. सध्याची राजकीय दशा म्हणा की, स्थिती लोक आंदोलनाच्या घोषणांवर परिणाम करणारी वाटत नाही. उलटपक्षी अर्थपूर्ण बळाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, अशा वातावरणात हा पक्ष आपला प्रभाव उमटवू शकला तर तो एक चमत्कार ठरेल.
जळगाव जिल्ह्यात या पक्षाचा एकही आमदार नाही. जिल्हा संघटनेच्या पातळीवरही जिल्हाप्रमुख म्हूणन जे कार्यरत आहे, त्यांना पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर अस्तित्वाची लढाई लढावी लागेल. तथापि, या पक्षात स्थानिक पदाधिकाऱ्यांपेक्षा पक्ष नेतृत्वाने नियुक्त केलेला (स्थानिक नव्हे) जिल्हा संपर्क प्रमुखाच्या निर्णयाला अधिक महत्त्व दिले जाते, हे वेळोवेळी घडलेल्या राजकीय स्थित्यंतरावेळी अनुभवास आले आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय विचार करता पाच मतदार संघात अनुक्रमे जळगाव ग्रामीण, पारोळा, पाचोरा, चोपडा आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे प्रणित शिवसेनेचे आमदार राजकीय दृष्ट्या प्रबळ आहेत. हीच स्थिती भाजपची देखी आहे. जामनेर, जळगाव शहर, यावल-रावेर, चाळीसगाव आणि भुसावळ या मतदारसंघात भाजपचे आमदार आपला प्रभाव कायम ठेवून आहेत. अशा स्थितीत शिवसेना उबाठासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील लढाई फारच आव्हानात्मक आहे.

जळगाव मनपावर पुन्हा वर्चस्व मिळविणे अवघडच…!

जळगाव शहर महापालिकेवरची सत्ता शिवसेना उबाठाच्या हातात अडीच वर्षे होती. २०२१ ते २०२३ ह्या काळात जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा होता. पण ज्यांच्यामुळे तो झेंडा होता. त्यातील काही मंडळी वेगळ्या मार्गाने जाण्याच्या विचारात असल्याचे समजते. त्यामुळे जळगाव मनपावर पुन्हा वर्चस्व मिळविणे, हे फारच अवघड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here