प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने गौरव
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम ज्ञानदेव (एस. डी.) भिरुड यांना त्यांच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ‘समाज चिंतामणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत ‘समाज चिंतामणी प्रतिष्ठान’ या मान्यताप्राप्त संस्थेतर्फे त्यांना हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे मानसपुत्र डी. बी. महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून भिरुड यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम केले आहे. प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात निरपेक्ष आणि असामान्य कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी तसेच भगीरथ शाळेचे शिक्षक डॉ. अशोक पारधे, संजय बाविस्कर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.